पुणे -नाशिक द्रूतगती रेल्वे प्रकल्पाचा अखेर मार्ग अहिल्यानगर-शिर्डीमार्गे; जुन्नर, संगमनेर करांचा विरोध
1 min read
पुणे दि.७:- गेल्या अनेक महिन्यांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे -नाशिक द्रूतगती रेल्वे प्रकल्पाचा अखेर मार्ग अहिल्यानगर-शिर्डीमार्गेच जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेच्या अधीवेशनात या मार्गाची घोषणा केली.
या मार्गामुळे औद्योगिक क्षेत्राबरोबर आर्थिक, शैक्षणिक व्यावसायिक, धार्मिक क्षेत्रांना चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पुणे-नाशिक शहरांमधील अंतर दूर करण्यासाठी थेट पुणे ते नाशिक द्रूतगती रेल्वे मार्गिका प्रकल्प गेल्या २० वर्षांपासून प्रस्तावित आहे.
त्यानुसार या प्रकल्पाचा ‘महारेल’ कडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला. मात्र मार्गिकेदरम्यान जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील ‘जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) हा जगातील सर्वात मोठा दूर्बिण संशोधन प्रकल्प अडथळा ठरत असल्याने
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी हा मार्गावरून रेल्वे प्रकल्प उचित ठरणार नाही, असे जाहीर केल होते. तसेच, पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक या नवीन रेल्वे मार्गाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेशही दिले.
मात्र,स्थानिक नागरिकांपासून लोकप्रतिनिधींनी अहिल्यानगर मार्गे रेल्वेला विरोध दर्शवून थेट पुणे नारायणगाव -सिन्नर-नाशिक हाच उचित मार्ग असून त्याबाबत मागणी केली होती.रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले,जुन्नर येथील ‘जीएमआरटी’ ही ३१ देशांच्या योगदानाने उभारलेली आंतरराष्ट्रीय वेधशाळा आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने केलेल्या अभ्यासानुसार, या रेल्वेमार्गामुळे वेधशाळेच्या निरीक्षणांना अडथळा येण्याटी दाट शक्यता आहे. त्यामुळे हा मार्ग उचित नाही. नारायणगावमार्गे नक्कीच प्रवासाचा कालावधी कमी होईल, मात्र देशाच्या मोठ्या संपत्तीला धोका पोहचविणे उचित नसल्याने मार्ग वळविणे गरजेचे होते.
नवीन अहिल्यानगर-शिर्डीमार्गे नाशिक हा मार्ग अत्यंत सुलभ असून यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरीलवैज्ञानिक प्रकल्पाचे संरक्षण होणार आहे.’या नवीन मार्गामुळे केवळ दोन शहरे जोडणार नाही, तर धार्मिक पर्यटन, औद्योगिक विकास आणि शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
१२ ज्योतीर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर, साईबाबांचे शिर्डी ही धार्मिक आणि पर्यटन स्थळे एकत्र येतील. चाकण येथील औद्योगिक वसाहतीतून रेल्वे मार्ग असल्याने माल वाहतूक खर्च कमी होईल, नव्या गुंतवणुका आकर्षित होतील. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स,अभियांत्रिकी क्षेत्राला मोठा फायदा होणार शिक्षण, संशोधन, कृषी, रोजगार आदी भरभराट होणार असल्याचेही वैष्णव यांनी स्पष्ट केले.
असा असणार मार्ग – पुणे- चाकण औद्योगिक वसाहत- अहिल्यानगर – निंबळक – पुणतांबा – शिर्डी – नाशिक प्रकल्पाची सद्य स्थिती नाशिक ते शिर्डी ‘डीपीआर’ पूर्ण
शिर्डी ते पुणतांबा १७ किलोमीटर मार्गिका दुहेरीकरण मंजूर
पुणे ते अहिल्यानंगर १३३ किलोमीटर डीपीआर पूर्ण
निंबळक ते अहिल्यानगर ६ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम सुरू पुणतांबा ते निंबळक १७ किलोमीटर दुहेरीकरणासाठी २४० कोटी मंजूर
