देव उजळून देण्याच्या बाहण्याने ज्येष्ठ नागरिकांचे ६ तोळे दागिने लांबवले
1 min read
ओझर दि.२२:- लक्ष्मण शंकर बोऱ्हाडे आणि त्यांच्या पत्नी विमल लक्ष्मण बोऱ्हाडे शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील या ज्येष्ठ नागरिकांचे ६ तोळे सोन्याचे दागिने दोघा भामट्यांनी लंपास केले. त्यामध्ये तीन तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याची माळ तसेच दिड तोळ्याची चैन या दागिन्यांचा सामावेश आहे.
काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकी वरून आलेले दोन अज्ञात चोरटे गुरुवारी (दि. २०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी आले. देव्हार्यातील देव उजळून देतो असे सांगून चांदिचा देव उजळून दिला. त्यानंतर त्यांनी आम्ही दागिने पॉलिश करून देतो असे सांगून त्यांच्याकडून दागिने मागितले.
या दाम्पत्याने आपल्या जवळचे सोन्याचे दागिने त्या चोरट्यांकडे दिले व एक झाकणाचा स्टीलचा डबा आणायला सांगितले. डब्यात पाणी घेऊन त्यात हळद टाकून दागिने टाकल्याचे चोरट्यांनी भासवले. हा डबा गॅसवर उकळण्यास ठेवायला सांगितला.
त्यानंतर त्यांनी या दाम्पत्यास एक पावडरची पिशवी देऊन त्यात पॉलीश पावडर असल्याचे सांगितले व चोरट्यांनी तेथून पोबारा केला. लक्ष्मण बोऱ्हाडे यांनी डबा उचकून पाहिले असता दागीने नसल्याचे पाहिल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांचा मुलगा मल्हारी बोऱ्हाडे याने घराजवळील आणि परिसरातील सीटीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात दोन चोरटे दुचाकीवरून कारखान्याच्या दिशेने गेल्याचे आढळले. जुन्नर पोलिसांत तक्रार दाखल आली आहे.
