शासनाच्या आरोग्य विभागाने मातृ आणि बाल आरोग्य सेवांमध्ये मोठी प्रगती साधली

1 min read

मुंबई दि.२२:- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मातृ आणि बाल आरोग्य सेवांमध्ये डिजिटल माध्यमातून मोठी प्रगती साधली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून सुरू झालेल्या“प्रोजेक्ट सुविता”अंतर्गत ५० लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंदणी पूर्ण केली आहे. याशिवाय ४० लाख गर्भवती महिलांचा या उपक्रमात सहभाग नोंदविला गेला आहे. अशा प्रकारे राज्यात एकूण ९४ लाख लाभार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला असून, हा जगातील सर्वात मोठ्या राज्य-नियंत्रित व वर्तनशास्त्र-आधारित आरोग्य संप्रेषण कार्यक्रमांपैकी एक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभिनंदन केले आहे. शासनाने भविष्यातही या भागीदारीतून राज्यातील लसीकरण ९५ टक्के पेक्षा अधिक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.जुलै २०२१ पासून राज्य शासनाने नॉन-प्रॉफिट संस्था ‘डेव्हलपमेंट कॉन्सोर्टियम प्रोजेक्ट सुविता’ यांच्या सहकार्याने एसएमएस रिमाइंडर कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत बालकांचे वेळेवर लसीकरण आणि गर्भवती महिलांसाठी मातृ आरोग्य सेवा वाढविण्यासाठी वेळेवर पाठविले जाणारे एसएमएस संदेश दिले जातात. प्रत्येक संदेशात लसीचे नाव, त्या लसीने कोणत्या आजारांपासून संरक्षण होते याची माहिती आणि जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क करण्याचे आवाहन यांचा समावेश असतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!