नवांकुर 2K26 : करिअर मार्गदर्शनासोबत आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा जागर

1 min read

बोटा, संगमनेर दि.१० :- विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बोटा येथे आयोजित ‘नवांकुर 2K26’ या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ०९/०९/२०२६ रोजी करिअर गाईडन्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान तसेच विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारे विविध आईस ब्रेकींग गेम्स व स्टेज डेअरिंग उपक्रम उत्साहात पार पडले.

सकाळच्या सत्रात दहिफळे पांडुरंग दिगंबर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. ते ME (VLSI and Embedded System), मोटिव्हेशनल स्पीकर असून त्यांना अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, संगमनेर येथे १७ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी Training and Placement Officer म्हणूनही काम केले असून Shivshakti Techno Services, छत्रपती संभाजीनगरचे संस्थापक तसेच Shivshakti Gramvikas Pratishthan, कोलवाडीचे संस्थापक-सचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचीही प्रेरणा मिळाली.

आपल्या मार्गदर्शनातून दहिफळे यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी स्पष्ट ध्येय निश्चित करणे, स्वतःची क्षमता ओळखणे, कौशल्य विकास, संभाषण कौशल्य, सॉफ्ट स्किल्स, वेळेचे व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टिकोन, टीमवर्क आणि नेतृत्वगुण यांचे महत्त्व समजावून सांगितले. बदलत्या रोजगारविश्वात केवळ शैक्षणिक गुण पुरेसे नसून तांत्रिक ज्ञानासोबत संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आजपासूनच विविध कौशल्यांचा सराव करून त्यांचा आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. राहुल मुळजकर, उपप्राचार्य डॉ. प्रशांत फटांगरे, अकॅडमिक डीन प्रा. प्रकाश वाकचौरे, प्रथम वर्ष समन्वयक प्रा. योगेश राऊत तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांचा संकोच दूर करून त्यांच्यातील संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि स्टेज डेअरिंग वाढविण्यासाठी आईस ब्रेकींग गेम्स व विविध मनोरंजक उपक्रम घेण्यात आले. अभियांत्रिकीच्या नव्या वातावरणात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी सहज संवाद साधता यावा, नवीन मित्र-मैत्रिणी निर्माण व्हाव्यात, समूहभावना विकसित व्हावी आणि महाविद्यालयीन वातावरणाशी त्यांचे भावनिक नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या सत्राचे नियोजन प्रा. प्रमिला शिंदे, प्रा. सविता बोरकर, प्रा. रूपाली वाकळे आणि प्रा. ऋजुता सातपुते यांनी प्रभावीपणे केले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला आत्मविश्वास आणि कलागुण व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रथम वर्ष समन्वयक प्रा. योगेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी संयोजक साहिल कोल्हे आणि प्रतीक्षा गाडेकर यांनी केले. नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच करिअरच्या संधी, आवश्यक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासाची दिशा देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी संयोजकांचे अमूल्य सहकार्य लाभले. नवांकुर 2K26 च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला सुरुवातीपासूनच योग्य दिशा देण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न दिसून आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!