‘ही’ स्पर्धा देणार जिल्ह्यातील कृषी व पर्यटन क्षेत्राला चालना:- जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी

1 min read

पुणे दि.१४:- पुणे शहर व प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत्या १९ जानेवारी पासून आयोजित करण्यात येत असलेल्या बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेले उच्च दर्जाचे रस्ते जिल्ह्यातील शेती, लघुउद्योग व पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील असा विश्वास पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज व्यक्त केला.पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डुडी यांनी सायकल शर्यत जाणार असलेल्या विविध गावांमधील स्थानिकांशी थेट संपर्क करून स्पर्धेमुळे झालेल्या पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे विविध क्षेत्रात होऊ शकणाऱ्या प्रगतीविषयीच्या भावना पत्रकारांसमोर मांडल्या.“ज्या व्यक्त्तींशी थेट संपर्क साधून आम्ही त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्या व्यक्तींना वेळेच्या कमतरतेमुळे आज आपल्यापुढे आणता आले नाही. परंतु, रस्ते विकासामुळे बदलेल्या परिस्थितीविषयी त्यांच्या भावना त्यांच्याच शब्दात या प्रेस रिलीजच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहोत”, असे डुडी यांनी आवर्जून नमूद केले.सायकल शर्यतीमुळे ग्रामीण भागात बळकट झालेले रस्त्याचे जाळे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असून शेतात पिकवलेला माल अवघ्या काही तासांत शहरात पाठवणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे, त्यामुळे सायकल शर्यतीचा उपक्रम शेती विकासाला बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना शेतकरी वर्गाने व्यक्त केली असल्याचे डुडी यांनी सांगितले.सासवडमध्ये सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून दुर्मिळ विदेशी फळे पिकवण्याचा उपक्रम सुरु झाला असून त्याचा चांगले यश मिळत आहे. या भागातील प्रगतीशील शेतकरी महेश पोमण यांनी आपल्या शेतामध्ये ब्लूबेरी, मलबेरी, रोजबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, गोजबेरी या फळांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करून शेती करण्यास सुरवात केली आहे. आपल्याकडे होत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीमुळे ग्रामीण भागातील रस्ते उत्तम झाले आहेत, त्यामुळे आमच्याकडे तयार होणारी फळे ही कमी वेळेत बाजारपेठेत पोहचवणे शक्य होणार असल्याचे पोमण यांनी सांगितले.सासवड भागात तयार होणारा अंजीर सर्वत्र प्रसिद्ध आहे. या भागातील तापमान त्यासाठी पोषक आहे. बागेतून अंजीर काढल्यानंतर तो दोन दिवस टिकतो. शर्यतीच्या निमित्ताने रस्ते उत्तम झाले असल्याने बागेतून अंजीर काढल्यावर आता ते पहिल्यापेक्षा कमी वेळेत पुण्यातील बाजारपेठेत पोहोचवणे शक्य होणार असल्याचे समाधान प्रगतिशील पद्धतीने अंजिराची शेती करणाऱ्या बाळासाहेब काळे यांनी व्यक्त केले. शेतमाल आता नेहमीपेक्षा कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचत असल्याने त्याला निश्चितपणे चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होत आहे, इतकेच नाही तर ताजा शेतमाल ग्राहकांना त्याच दिवशी मिळत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे ते शक्य होत असल्याचे सासवड येथील अशोक काळे या शेतकऱ्याने नमूद केले.भारतात येणारे परदेशी पर्यटक हे साधारणतः राजस्थान, गोवा, केरळ या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देतात. परंतु, भविष्यात मात्र हे चित्र बदलू शकते असे आशावादी वातावरण सध्या पुणे आणि परिसरात अनुभवायला मिळत आहे. तसेच परदेशी पर्यटकांना ‘मावळवारी’ करण्याची इच्छा निर्माण होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.भारतात प्रथमच पुणे जिल्ह्यात आयोजित होत असली बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत याला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. या स्पर्धेमुळे नजीकच्या भविष्यात पुणे आणि परीसरामधील पर्यटनामध्ये मोठी वाढ होऊन इथल्या गावांना आर्थिक बळकटी मिळण्यास मदत होणार असल्याचा अंदाज या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीनी वर्तवला आहे.मावळचा परिसर हा निसर्गसंपन्न आहे.त्यामुळे आसपासच्या परिसरातील अनेक पर्यटक त्याचा ‘फील’ घेण्यासाठी इथे वारंवार येत असतात. आता या भागातून बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत जाणार असून यामध्ये ३५ देशांमधील आंतरराष्ट्रीय सायकलपटू २९ संघांच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.सध्या या स्पर्धेची चर्चा सर्वत्र सुरु असून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून विदेशात देखील ही शर्यत दिसणार आहे व जगभरातील सायकल शर्यतीच्या चाहत्यांना दिसणार आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या भागातील नागरिकांमध्ये आपल्या मावळ या भागाविषयी उत्सुकता निर्माण होईल आणि येत्या काही वर्षांमध्ये नकळतपणे त्यांची पावले मावळाकडे वळलेली दिसतील, असे मत साई गणेश बोटिंग सेंटरचे प्रमुख रोहिदास टेमघरे यांनी व्यक्त केले.मावळात हाडशी, तिकोना, तुंग, मोरगिरी, पवना हा परिसर नैसर्गिक दृष्ट्या संपन्न आहे, त्यामुळे या भागाची विदेशी पर्यटकांना भुरळ पडल्याखेरीज राहणार नाही. सायकल शर्यतीनंतर इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. या भागातील रस्ते चांगले झाले आहेत, त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे.या परिसरात अॅग्री टुरिझमचे रिसॉर्ट देखील मोठया प्रमाणात आहेत, विदेशी पर्यटकांना त्याचा अनुभव घेता येईल. विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या भागाची एक वेगळी ओळख निर्माण होईल, इतकेच नव्हे तर शेतीच्या विकासाला चांगली गती मिळणे देखील शक्य होणार असल्याचे, शिक्षक म्हणून काम करणाऱ्या भास्कर जाधव यांनी सांगितले.मावळ पट्टयांमध्ये येणाऱ्या ऐतिहासिक किल्यांचे महत्व देखील आणखी वाढणार असून या शर्यतीमुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. पावसाळयात इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र शर्यत झाल्यानंतर वर्षभर हे चित्र दिसेल आणि त्यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे. रिसॉर्टची संख्या देखील नजीकच्या भविष्यात वाढू शकते. त्यामुळे अर्थकारण गतिमान होण्यास निश्चितपणे मदत होईल असे व्यावसायिक म्हणून काम करणाऱ्या मनीषा ठकार यांनी नमूद केले.मावळमध्ये पॉली हाऊसचे प्रमाण अधिक आहे, इथे उत्तम दर्जाच्या डच गुलाबांची निर्मिती होत असते. या शर्यतीमुळे मावळाचे नाव जगाच्या नकाशावर पोहचण्यास निश्चितपणे मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे इथे तयार होणाऱ्या गुलाबाला देखील नवीन बाजारपेठ मिळण्यास मदत होऊ शकते. इथले रस्ते उत्तम झाल्यामुळे गावांचा विकास, पर्यटन वाढीस त्याची मदत होणार असल्याचे या भागातील प्रगतिशील शेतकरी स्वप्नील टेमघरे यांनी सांगितले.सायकल शर्यतीमध्ये युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, आशिया, आफ्रिका आदी खंडामधून ३५ देशांतील तब्बल १७१ आंतरराष्ट्रीय सायकलपटू आपला सहभाग नोंदवतील, त्यामुळे भविष्य काळात या देशातले पर्यटक सायकल शर्यतीच्या निमिताने नक्कीच इथे येताना दिसतील. केतकावळे जवळून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला सायकल स्वारांच्या सुरक्षेसाठी लोखंडी जाळी लावून त्याचे वेल्डिंग करण्याचे काम हाती घेतलेल्या शहाजी पवार व शिवाजी शिंदे पुणे जिल्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या बजाज पुणे ग्रँड टूरसाठी काम करणे म्हणजे देशसेवेत सहभाग असल्याचे मानत रात्रंदिवस काम करून काम वेळेत पूर्ण करण्यावर भर देत आहेत.पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत होत आहे. हे आपल्या देशासाठी, राज्यासाठी आणि पुण्यासाठी भूषणावह गोष्ट आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून रोजगाराची संधी देखील उपलब्ध होते. त्यामुळे अशा प्रकारच्या शर्यतीचे आयोजन दरवर्षी होण्याची आवश्यकता असल्याचे शहाजी पवार यांनी सांगितले.तर, गणेश सायकल मार्ट हे सासवड रस्त्यावर असणारे संजय पांडुरंग शिवरकर यांचे पन्नास वर्षांचे सायकल दुकान काळ बदलला तरी आजही टिकून राहिले आहे. त्याचे कारण म्हणजे संजय यांचे लहानपणापासून सायकलवर असणारे नितांत प्रेम. गेल्या ५० वर्षांपासून संजय हे न थकता अथकपणे सायकल दुरुस्ती व सायकल व्यवसायाशी जोडलेले आहेत.संजय शिवरकर सांगतात, “मी जेव्हा व्यवसायाची सुरुवात केली, तेव्हा आमच्याकडे ८० सायकली होत्या. तेव्हा त्या सायकली आम्ही भाड्याने द्यायचो. त्या काळात सायकल चालवणे म्हणजे फॅशन नव्हते, तो छंदही नव्हता. तर ती लोकांची गरज होती. कुठेही जायचे असेल तर सायकल हा सगळ्यात सोपा आणि परवडणारा पर्याय होता. गावाचं सामाजिक आयुष्य सायकलभोवती फिरत होतं. काळ बदलत गेला. मोटारसायकली आल्या,नंतर मोठमोठ्या गाड्या. सायकल हळूहळू मागे पडत गेली.”एक काळ असा आला की, सायकल वापर खूपच कमी झाला. त्यामुळे दुकानात येणारी गर्दी कमी झाली. मात्र, परिस्थिती अशी राहत नाही, ती बदलते यावर विश्वास असल्याने मी हा व्यवसाय सोडला नाही. आपल्यासाठी सायकल हा व्यवसाय नाही तर तो जीवनाचा एक अविभाज्य भाग राहिला आहे. असे सांगत शिवरकर पुढे म्हणाले की, “गेल्या काही काळापासून पुन्हा एक बदल दिसू लागला आहे, तो म्हणजे लोक पुन्हा सायकलकडे वळू लागले आहेत.त्यामागचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली.” आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी लोक पुन्हा एकदा सायकलकडे वळू लागले आहेत. आता त्यामध्ये इथे होत असणाऱ्या बजाज पुणे ग्रँड सायकल टूर या शर्यतीमुळे आगामी काळात सायकल व्यवसायाचे चित्र बदलले दिसल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वास देखील शिवरकर यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!