बेल्हे -जेजुरी महामार्गावर अपघात; चालक जखमी
1 min read
बेल्हे दि.१४:- कावळ पिंपरी (ता. जुन्नर) येथील बेल्हे – जेजुरी महामार्गावर गावात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. गावच्या शाळेजवळ व गावांमध्ये या रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्याने गेल्या एक महिन्यामध्ये पाच अपघात झाले आहेत. या वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दि.१३ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एमएच १५ जेएम ४३२१ ही चारचाकी गाडी बेल्ह्याच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली गेली व पलटी झाली. गाडीतील एअरबॅगमुळे चालक थोडक्यात बचावला व जखमी झाला.

गाडीमध्ये चालक एकटाच होता त्यामुळे आनर्थ टळला. परंतु गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणी गावचा व शाळेचा परिसर असल्याने रहदारी असते वाहने सावकाश चालवले जात नाहीत. रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वाहने असतात.

या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये चार ते पाच अपघात होऊन ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. व एकाचा मृत्यू झाला असल्याची याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना दिली.

या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवावेत अशी मागणी गावचे माजी सरपंच फकीर पाबळे, माजी उपसरपंच शरद पाबळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश पाबळे, गावचे पोलीस पाटील कृष्णा शिरतर, विशाल शिरतर, राजू वाळुंज, रामा पाबळे,संदीप जाधव तसेच ग्रामस्थांनी केली आहे..

प्रतिक्रिया
” प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही या ठिकाणी गतिरोधक बसवले गेले नाहीत. प्रशासन किती जणांचा बळी घेणार आहे. या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
गणेश पाबळे, सामाजिक कार्यकर्ते कावळ पिंपरी

