नळवणेत सायफन पद्धतीने सोडले ओढ्यानाल्यांना पाणी

1 min read

नळवणे दि.१४:- दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळख असलेल्या नळवणे (ता. जुन्नर) येथील ग्रामस्थांनी शेतीसाठी पाण्याची सध्याची गरज ओळखून ग्रामस्थांनी एकत्र येत निर्णय घेऊन पाण्याचे सुयोग नियोजन केले आहे. नुकतेच येथील मोरशेत पाझर तलावातून मोठ्या पाईपच्या साहाय्याने सायफन पद्धतीने शेतीसाठी ओढ्यानाल्यांना पाणी सोडल्याने हा निर्णय सध्या पिकांसाठी फायदेशीर ठरला आहे.आणे पठार सर्व गावांमध्ये नेहमीच शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत असते. यावर्षी येत्या उन्हाळ्यात लोकवर्गणीतून तसेच सरकारी निधी मिळवून मोरशेत पाझर तलावाचा साठलेला गाळ काढून खोलीकरण करण्याचा तसेच मोरशेत पाझर तलाव व पळस्टिका पाझर तलावाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. लोकसहभागातून शेतीसाठी ओढेनाल्यांना तलावातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे सध्या पाण्याची गरज असलेल्या परिसरातील शेती पिकांना काही प्रमाणात फायदा झाला आहे. दरम्यान गेल्या आठ वर्षांपूर्वी मोरशेत पाझर तलावाची दुरुस्ती, लोकसहभाग व सरकारी निधीतून करण्यात आली होती. यामुळे या पाझर तलावात पावसाळ्यात पाणीसाठा होतो. यामुळे विशेषतः नळवणे गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहसा भेडसावत नसला तरीही शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा होण्यासाठी या मोरशेत पाझर तलावाची उंची वाढवणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मध्यंतरी शेतकऱ्यांनी गाव बैठक घेऊन कोरडे पडलेले ओढे, साठवण बंधारे पुन्हा पाण्याने भरण्याचे नियोजन केले. मोरशेत पाझर तलावांतून सायफन पद्धतीने पाणी सोडण्यात आले. तसेच पळस्टिका पाझर तलावातून पाझरणारे पाणीही ओढ्यात सोडण्यात आले.यावेळी गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपले वीजपंप बंद ठेवून, पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमाला काही प्रमाणात यश मिळाल्याने ग्रामस्थांच्या आत्मविश्वास दुणावला आहे. दरम्यान गेल्या आठवडाभरापूर्वी ग्रामस्थांनी मोरशेत पाझर तलावातून सायफन पद्धतीने पाणी सोडण्याचे बंद केलेले आहे.
तलावांची उंची वाढवण्याची गरज ?

नळवणे येथील मोरशेत व पळस्टिका पाझर तलावाचे खोलीकरण करून उंची वाढवल्यास, पावसाळ्यात पाणीसाठा वाढू शकतो. यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. दरम्यान सरकारने मोरशेत व पळस्टिका पाझर तलावाचे खोलीकरण करून उंची वाढवण्यासाठी सरकारी निधी उपलब्ध करून द्यावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!