भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार; इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायण यांनी दिली माहिती

1 min read

मुंबई दि.२७:- आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह, प्रक्षेपण वाहने, वैज्ञानिक मोहिमांच्या माध्यमातून स्वतःची जागतिक ओळख निर्माण केली आहे. पुढील काळात भारत मानव अंतराळ मोहिमेच्या दिशेने वाटचाल करत असून गगनयान कार्यक्रमांतर्गत अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू आहे.भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक २०३५ पर्यंत उभारण्याचे, तर २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याची योजना आखण्यात आली असल्याचे इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायण यांनी जाहीर केले.भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचा सुरुवातीपासून ते जागतिक दर्जाच्या मोहिमांपर्यंत ६३ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास नारायण यांनी बुधवारी आयआयटी मुंबईतील टेकफेस्टमध्ये मांडला. दृकश्राव्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात नारायण यांनी १९७५ मध्ये आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणा पासून सुरू झालेला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या चांद्रयान-३ मोहिमेपर्यंतच्या इस्रोच्या प्रवासाचा आढावा घेतला.त्या काळात भारताने उपग्रह, प्रक्षेपण वाहने, वैज्ञानिक मोहिमा आणि अनुप्रयोगांच्या माध्यमातून स्वतःची जागतिक ओळख निर्माण केल्याचे सांगताना नारायण यांनी प्रारंभीच्या काळात उपग्रह वाहतुकीसाठी सायकल आणि बैलगाडीचा वापर करावा लागल्याची आठवण करून दिली. त्या काळात केवळ मर्यादित तांत्रिक ज्ञान आणि साधने उपलब्ध होती. मात्र, अवघ्या पाच दशकांत भारताने प्रक्षेपण तंत्रज्ञान, उपग्रह निर्मिती, दळणवळण, पृथ्वी निरीक्षण आणि अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती साधली आहे. आज पीएसएलव्ही, जीएसएलव्ही,एलव्हीएम-३ आणि एसएसएलव्ही यांसारखी स्वदेशी प्रक्षेपण वाहने विविध कक्षांमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहेत.अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने चांद्रयान-१ मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश आढळल्याची ऐतिहासिक घोषणा केली. चांद्रयान-२ मोहिमेतील लँडर अपयशी ठरला असला तरी त्याचा ऑर्बिटर आजही चंद्राच्या कक्षेत कार्यरत असून उच्च दर्जाची माहिती पाठवत आहे. चंद्रयान-३ मोहिमेने मात्र २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून इतिहास घडवला.भारताची मंगळ कक्षा मोहीम ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरलेली जगातील पहिली मोहीम ठरली.तसेच एका प्रक्षेपणात १०० हून अधिक उपग्रह प्रक्षेपित करून भारताने जागतिक विक्रम नोंदवला आहे. क्रायोजेनिक इंजिनही भारताने स्वदेशी विकासित केले आहे. पुढील काळात भारत मानव अंतराळ मोहिमेच्या दिशेने वाटचाल करत असून गगनयान कार्यक्रमांतर्गत अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू आहे.२०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचे लक्ष्य आहे, तर २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याची योजना आखली आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा १९४७ मध्ये अत्यंत मर्यादित वैज्ञानिक पायाभूत सुविधा असलेला भारत आज विकसित देशांच्या पंक्तीत उभा राहिला आहे.उपग्रह तंत्रज्ञानातील विकासामुळे अर्थव्यवस्थेला फायदा
उपग्रह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्यात अंतराळ कार्यक्रमाची मोठी भूमिका आहे. अन्नसुरक्षा, जलसुरक्षा, वनसंवर्धन, दूरचित्रवाणी, दूरसंचार, टेलिमेडिसिन, आपत्ती व्यवस्थापन आणि मत्स्य व्यवसाय या क्षेत्रांत उपग्रहांचा प्रभावी वापर केला जात आहे. संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती उपग्रहांच्या माध्यमातून दररोज लाखो मच्छीमारांना दिली जाते, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले असून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!