जगातील सर्वात मोठ्या रोबोटिक्स आणि तंत्रज्ञान महोत्सवात पुणे जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी करणार भारताचे प्रतिनिधित्व
1 min read
पुणे दि.२२:- एस्टोनिया येथे होणाऱ्या ‘रोबोटेक्स इंटरनॅशनल २०२५’ या जगातील सर्वात मोठ्या रोबोटिक्स आणि तंत्रज्ञान महोत्सवासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा महोत्सव ५ ते ६ डिसेंबर रोजी टालिन (Tallinn), एस्टोनिया येथे आयोजित करण्यात आला आहे.
तब्बल ७८ देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या महोत्सवात पुणे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसमावेशक STEM शिक्षण प्रणालीतून व BMC Software India, ZS Associates India, BNY Mellon व WNS या कॉर्पोरेट सीएसआर (CSR) भागीदारांच्या पाठिंब्याने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.
या स्पर्धेत देशभरातील ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी ‘एंटरप्रुनरशिप’, ‘वॉटर रॅली’, ‘फोक रेस’, ‘गर्ल्स फायर फायटिंग’ आणि ‘लाईन फॉलोअर’ अशा अत्याधुनिक रोबोटिक्स श्रेणींमध्ये सहभाग घेतला आहे. भारतभरातील शासकीय शाळांमधून आलेल्या १,००० हून अधिक स्पर्धकांपैकी अकरा विद्यार्थ्यांनी डिझाईन, कोडिंग,
धोरणात्मक विचार व संघभावना या क्षेत्रांतील अपवादात्मक कौशल्यांमुळे हे स्थान मिळवले आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद येथील विद्यार्थी समाविष्ट आहेत.
हे यश पुण्यातील ग्रामीण व शासकीय शाळा शिक्षणव्यवस्थेची ताकद अधोरेखित करते – जी विद्यार्थ्यांना मर्यादित साधनसंपत्ती असूनही नवकल्पना, कौशल्यविकास आणि जागतिक स्वप्ने पाहण्याचे सामर्थ्य देते.पुणे जिल्हा परिषदेच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे, भविष्याभिमुख कौशल्यांच्या समावेशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा भक्कम पाया तयार झाला आहे.
कॉर्पोरेट सीएसआर भागीदारीमुळे पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या असून रोबोटिक्स प्रयोगशाळा, शिष्यवृत्ती आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थी जागतिक दर्जाचे यश मिळवण्यास सक्षम झाले आहेत.
ज़िल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
