कोल्हापूर ACBच्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारला कर्नाटकात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी
1 min read
कोल्हापूर दि.१२:-कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरूहून कोल्हापूरकडे परत येत असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी पाटील यांची कार एका लॉरीला जोरदार धडकली. या धडकेत कारचा पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला. अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कार आणि लॉरी यांच्यातील जोरदार धडकेमुळे हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
