बेल्हे, आणे, आंबेगव्हाण गावातील दुभती जनावरे चोरणारी टोळी जेरबंद; पाच गुन्हे उघडकीस
1 min read
ओतूर दि.३०:- दुभती जनावरे चोरणाऱ्या सराईत टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणून, जनावरांसह पिकअप असा ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नरेश भाऊ मोरे (वय ३९) आणि सूरज अशोक पारधी
(वय १९, दोघेही रा. कळंबड, ता. मुरबाड, जि. ठाणे) यांना अटक केली आहे.जुन्नर परिसरात दुभती जनावरे चोरीच्या घटना वाढल्या होत्या.बेल्हे, आणे, आंबेगव्हाण या गावांतील चार शेतकऱ्यांच्या पाच दुभत्या म्हशी व व ओझर येथील शेतकऱ्याचा एक बैल मागील काही महिन्यात चोरीला गेला होता.
वयाप्रकरणी जुन्नर, आळेफाटा, ओतूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. दुभती जनावरे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.त्यासंबंधी ओतूर, जुन्नर, आळेफाटा पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हे दाखल झाले.
त्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी विशेष पथकाची स्थापना केली. तक्रारदारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तब्बल १२० किलोमीटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
तांत्रिक विश्लेषणानंतर नरेश मोरे हा जनावरांची चोरी करीत असून, तो खुबी गावातील जंगलात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मोरेसह दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ओतूरमधील दोन, आळेफाटा परिसरातील दोन, जुन्नरमधील एका गुन्ह्यांची उकल केली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय महादेव शेलार, एपीआय लहू थाटे, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, नदीम तडवी, दीनेश साबळे, रोहित बोंबले यांनी केली.
शेतकऱ्यांचे पशुधन पोलिसांकडून परत
आठवड्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी शेळ्या-बोकडं चोरणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला, तर म्हशी चोरणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.
