पोळ्यानिमित्त बेल्हे बाजारात बैलांची मोठी आवक

1 min read

बेल्हे दि.१- येथील सोमवार (दि.३०) रोजी भरलेल्या आठवडे बैल बाजारात गावरान, तसेच खिल्लारी, पंढरपुरी अशा विविध जातींच्या ४७९ बैलांची आवक झाली. त्या तुलनेत विक्री झाली नाही. त्यापैकी ३४८ बैलांची विक्री झाल्याची माहिती बेल्हे बाजार समितीचे कार्यालय प्रमुख शैलेश नाईकवाडी यांनी दिली. त्यामुळे या बैलबाजारात ग्राहक व व्यापाऱ्यांनी बैल खरेदी-विक्री करताना आठवडे बाजार गजबजून गेला होता. भाद्रपद पोळ्याचा सण बुधवार (दि.२) रोजी असून या बैलपोळ्याच्या सणासाठी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बैल विक्रीसाठी बाजारात आणले होते. तसेच शेतकऱ्यांनी बैल खरेदीसाठी मोठी गर्दी केली. तसेच पोळ्याचा सण जवळ आल्याने बैलांची चढ्या दराने खरेदी या बैल बाजारात झाली. बैलपोळ्याच्या सणाला बैल सजवण्यासाठी लागणारे साहित्यांची दुकान मोठ्या संख्येने सजली होती. या दुकानांमध्ये बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य घुंगरमाळ, तोढा, विविध रंगाचे गोंडे, झुली, मन्याच्या माळा, विविध रंगाच्या रेबीन, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आशा विविध प्रकारच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या. या सर्व प्रकारच्या वस्तू शेतकरी ग्राहक मोठ्या हौसेने खरेदी करताना दिसले. या आठवडे बाजारात खरेदी व विक्रीसाठी पुणे जिल्ह्यासह ठाणे, अहमदनगर, बीड, नाशिक अशा विविध ठिकाणावरून शेतकरी व व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे