कर्मवीर आण्णांच्या त्यागाचा वारसा आपण सर्वांनी चालवायला हवाः- संजय मोहिते

1 min read

बेल्हे दि.२०:- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्ताने श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात सभा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सावकार पिंगट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य दादा जाधव यांना प्रमुख वक्ते म्हणून निंमत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली कै. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शाखा हितचिंतक व थोर देणगीदार अर्जून शिंदे,राजेंद्र पिंगट,नारायण चोरे, प्रविण बांगर, कष्णा बांगर, प्रा. वर्षा घोलप व सीमा बाणखेले यांचा सन्मान या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संस्था ठेव पारितोषिक योजनेंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला. विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाखा इतिहासाला उजळणी देण्याबरोबरच कर्मवीर जयंती सप्ताहनिमित्त पार पडलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्रमुख वक्ते प्राचार्य दादा जाधव यांनी ‘कर्मवीर चरित्राचा विद्यार्थी जीवनावरील प्रभाव’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक प्राचार्य तुकाराम डोंगरे यांनीही आपल्या मनोगतातून कर्मवीरांना आदरांजली अर्पण केली. ध्येया पिंगट व सष्टी पवार या विद्यार्थीनींनी आपल्या वक्तत्वातून कर्मवीर आण्णांप्रती आपली कतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य ग्रामनेते रामभाऊ बोरचटे यांनी कर्मवीर जयंतीनिमित्त आपल्या भावना संयोजकांमार्फत उपस्थितांपर्यंत पोहचवल्या.

रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी व कर्मवीर जयंती सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय मोहिते आपल्या मनोगतात म्हणाले, ” रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली कै. लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागावर उभी राहिलेली संस्था आहे. तीर्थरुप आण्णांच्या त्यागाचा वारसा आपण पुढे चालवायला हवा. बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या आपण कायम ऋणात राहायला हवं. विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहतील हीच खरी कर्मवीर आण्णांना आदरांजली ठरेल.” कार्यक्रमाचे अध्यक्ष सावकार पिंगट यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ग्रामस्थांच्या वतीने संस्थेस संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी बेल्हे गावच्या लोकनियुक्त सरपंच मनिषा डावखर, शाळा समिती सदस्य पांडुरंग गाडगे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राजेंद्र गाडगे, शाळा व्यवस्थापन व विकास समिती उपाध्यक्ष कैलास आरोटे, सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके, युवा उद्योजक सुमित बोरचटे, माजी सरपंच गोरक्षनाथ वाघ, ग्रामपंचायत सदस्य समीर गायकवाड, जानकू डावखर, लहू गुंजाळ, बन्सी डावखर, राकेश डोळस, आब्बास बेपारी, बबन पिंगट, संजय विश्वासराव, विजय देशपांडे, शंकर गोफणे, रेश्मा बनकर, चित्रा कोकणे आदि सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन विठ्ठल पांडे व कोमल कोल्हे यांनी केले तर अजीम इनामदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे