जुन्नर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या स्थापनेस राज्य सरकारची मंजुरी:- आमदार अतुल बेनके
1 min readजुन्नर दि.२४:- जुन्नर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाच्या स्थापनेस राज्य सरकारने सोमवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. जुन्नर येथे सत्र न्यायालय सुरू होणार असल्याने पक्षकांराना आता खेड (राजगुरूनगर) येथे जाण्याची गरज नाही त्यांचा जाण्या येण्याचा वेळ या निर्णयामुळे वाचणार आहे.
आमदार अतुल बेनके यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी पुणे (सर्किट हाऊस) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जुन्नर तालुक्यातील काही विशेष कामांच्या बाबतीत चर्चा केली होती. यामध्ये जुन्नर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी. अशी जुन्नर तालुका बार असोसिएशनची अनेक वर्षापासून मागणी होती. आमदार बेनके यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने न्यायालय स्थापनेसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता झाली असून प्रस्तावाला मंजुरी मिळण्याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा केली होती आणि. आ. बेनके यांच्याकडून तसे पत्र उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. जुन्नर तालुक्याची भौगोलिक परस्थिती, वाढत्या न्यायालयीन दाव्यांची संख्या व तालुक्यातील पक्षकारांचा विचार करता हे न्यायालय स्थापन होणे गरजेचे होते. शासनाने जुन्नर येथे वरिष्ठ सत्र न्यायालय स्थापन करण्याच्या निर्णयाचे जुन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत किसनराव भास्कर. उपाध्यक्ष अॅड. समीर बाळासाहेब पुरवंत, उपाध्यक्ष अॅड. हेमंत यशवंत हाडवळे, सचिव अॅड. आशिष नारायण वानखेडे, ग्रंथपाल अॅड. समकित सुनील नानावटी आणि इतर पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.