श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात कर्मवीर जयंती महोत्सवानिमित्त आठवडाभर भरगच्च कार्यक्रम

1 min read

बेल्हे दि.२१:- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ वा जयंती महोत्सव श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२२ सप्टेंबर ते दि. २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजीत अभंग यांनी दिली.कर्मवीर जयंती सप्ताहाचा शुभारंभ रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमा पूजन व भव्य शोभा मिरवणुकीद्वारे होणार आहे.

दि.२४ सप्टेंबर रोजी पंचायत समिती, शिक्षण विभाग, जुन्नर व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न होणार असून या प्रसंगी अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. पांडुरंग गायकवाड उपस्थित असतील. दि. २५ सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक व्याख्यान व विद्यार्थीनींंसाठी आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात येणार असून या प्रसंगी जागतिक सर्पदंश व विषतज्ञ डॉ. पल्लवी राऊत व डॉ. सदानंद राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहेत. दि. २६ सप्टेंबर रोजी विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या माता पालकांच्यासाठी भव्य मेळावा आयोजीत करण्यात आला असून. या प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्यात्या शुभांगी शिंदे यांचे ‘विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत माता पालकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.दि. २७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ सप्टेंबर रोजी तीर्थरूप कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्त भव्य सभा समारंभाचे आयोजन रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागीय सल्लागार समितीचे सदस्य व शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य रामभाऊ बोरचटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते. व सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड तसेच प्राचार्य दादा जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिवाय दि. २९ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंती सप्ताहाचा समारोप शालेय गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभाने होणार असून या प्रसंगी स्वातंत्र्यवीर युवा फाऊंडेशन बेल्हे चे अध्यक्ष प्रशांत गाडेकर व पोलीस निरिक्षक दिनेश तायडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या भव्य कर्मवीर जयंती सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने सर्व शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन समिती व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष व सदस्य तसेच बेल्हे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, पालक व संस्था हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन विद्यालयाचे प्राचार्य अजीत अभंग यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे