बेल्हे गावचे वाचनालय ६ वर्षा पासून धूळखात
1 min readबेल्हे दि.२३:- बेल्हे येथील असून जवळपास १९७० साली चालू केलेले वाचनालय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे बंद पडले असून वाचन प्रेमींची अडचण निर्माण झाली असून, ते का बंद पडले याचीही चौकशी होणे गरजेचे असून, आज लाखो रुपयांची पुस्तके व ग्रंथ धूळ खात पडून आहेत. कालांतराने ती वाचाण्याच्या योग्यतेचीही राहणार नाहीत आणि वापरात नसल्याने इमारतीचीही दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे.शासनाचे धोरण आहे की, गावागावात वाचन संस्कृती रुजली पाहिजे, तरुण वर्गाची पावले वाचनालयाकडे वळली पाहिजेत, त्यांच्या बुद्धीची भूक पुस्तक वाचनाने शमली पाहिजे. तसेच सुसंस्कृत व निकोप समाज निर्मितीसाठी ग्रंथवाचन हे फार उपयुक्त आहे. परंतु या सर्वांना छेद देणारी घटना बेल्हे गावात घडली आहे. राज्यभरात असे अनेक वाचनालय धुळखत पडले आहेत.
असे म्हटले जाते की, कोणतेही गाव म्हटले की रस्ते, गटारे, आरोग्य सुविधा, क्रीडांगण, उद्यान या प्रत्येक गावाच्या प्रमुख गरजा असतात व त्या प्रामुख्याने पूर्ण झाल्यास ते गाव विकासाकडे वाटचाल करत असते असे म्हटले जाते, परंतु त्याचबरोबरीने याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची, तरुणांची सांस्कृतिक गरजही असते. ती म्हणजे चांगल्या आणि भरपूर वाचनीय पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालय असणे ही त्या गावाची सांस्कृतिक ओळख समजली जाते. आजची तरुण पिढी मोबाईल मध्ये व्यस्त झाली असून वाचन, व्यायाम याकडे दुर्लक्ष झाले आहे, सध्या ऑनलाईन वाचनाचा जमाना असून त्यालाही काही मर्यादा असतात. वाचनालयात पुस्तके व वर्तमानपत्रे चाळायची असतील तर तिथे बसूनच वाचन करण्याची व्यवस्था असली पाहिजे. वाचनालयासाठी जो फंड राखून ठेवला असेल तो त्याच कामासाठी वापरणे हे ग्रामपंचायतीचे प्रथम कर्तव्य आहे. गावातील मुलांचे व नागरिकांचे शैक्षणिक व सामाजिक ज्ञान वाढविण्यासाठी वाचनालयांची नितांत आवश्यकता असून ती काळाची गरज आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व इतर परिक्षेची तयारी करण्यासाठी वाचनालयातच अभ्यास कक्ष असायला पाहिजे. कारण तेवढ्यासाठी शहरात जाणे म्हणजे वेळेचा व पैशाचाही अपव्यव होतो.कोणत्याही गावाची सांस्कृतिक ओळख निर्माण होण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत. त्यामध्ये वाचन संस्कृती निर्माण होणे ही एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. भावी पिढीची वैचारिक, बौद्धिक,सांस्कृतिक जडणघडण होण्यासाठी सक्षम आणि परिपूर्ण सार्वजनिक वाचनालयाची नितांत गरज असते. वाचनालय बंद पडणे यासाठी स्थानिक पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच गावातील सजग नागरिक आणि प्रशासनाची या बाबतीतील उदासीनता हेच यामागील कारण आहे. म्हणूनच या कामी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांनी अग्रक्रमाने पुढे आले पाहिजे. आजच्या मोबाइलच्या जमान्यात दुर्दैवाने वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे.वाचाल तर वाचाल,या उक्तीनुसार विद्यार्थी,आबाल वृद्ध व एकूणच समाजातील सर्वच स्तरात वाचन संस्कृती वाढण्याच्या दृष्टीने चळवळ हाती घेणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी गावागावांतील वाचनालये उघडी असणे काळाची गरज असून, या संदर्भात बेल्हे ग्रामपंचायतीने योग्य ती काळजी घेऊन वाचनालय सुसज्ज करून ते दररोज उघडे राहील, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
चौकट
[दरवर्षी खर्चाच्या ९० टक्के अनुदान शासन देत असते परंतु काही वर्षांपासून हे ग्रंथालय बंद असल्यामुळे या ग्रंथाला कोणतेही अनुदान मिळालेले नाही. ग्रामपंचायत ग्रंथालय सुरू करण्यास २०१८ पासून उदासीन असल्याचे चित्र समोर आला आहे.]
प्रतिक्रिया
‘२०१८ पासून ग्रंथालय बंद आहे. आम्ही सदर ग्रंथालयाला शासकीय अनुदान मिळण्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करणार आहे. लवकरातील लवकर ग्रंथालय सुरू करू.’
मनीषा डावखर
सरपंच बेल्हे