ओतूर कपर्दिकेश्वर मंदिरात तांदळाच्या कलात्मक पिंडी
1 min read
ओतूर दि. १३:- जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने शिवलिंगावर सकाळी ६ वाजता विधिवत पूजा करण्यात आली.दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या आरतीचे मानकरी विकास पानसरे, राजेंद्र हैलकर तसेच निमंत्रित मानकरी सपत्नीक रमेश कोल्हे, शरद अण्णा चौधरी, विलास आप्पा दांगट हे होते. याप्रसंगी महेंद्र पानसरे, नितीन तांबे, सचिन तांबे, जितेंद्र डुंबरे, सागर दाते, अमोल डुंबरे. पुजारी गोविंद डुंबरे, सागर घोडेकर, दत्ता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिरात दोन तांदळाच्या कलात्मक पिंडी तयार करण्यात आल्या होत्या. मंदिरातील गाभारा व परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आला होता.
भाविकांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. कपर्दिकेश्वर महाराज की जय, हर हर महादेव च्या जयघोषात भाविकांनी रांगेत दर्शन घेतले. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त व दर्शनबारीची व्यवस्था ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. याप्रसंगी भाविकांना कपर्दिकेश्वर व चैतन्य स्विमिंग वॉकिंग ग्रुपच्या वतीने चिक्की व केळीचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी ओतूर ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात भरते. श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार होणाऱ्या तांदळाच्या कलात्मक पिंडी पहाण्यासाठी व दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक भक्त ओतूर येथे येतात.
श्रावणात प्रत्येक सोमवारी कपर्दिकेश्वर मंदिरात तांदळाच्या पिंडी तयार करण्यात येतात. येथे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची भावना आहे.