श्री. कुकडेश्र्वर आदिवासी हिरडा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी; २ कोटी रू. एकरकमी अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय 

1 min read

जुन्नर दि.७:- जुन्नर तालुक्यातील आदिवासी विभागातील महत्त्वाचा प्रकल्प श्री. कुकडेश्र्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या. हा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी पावले उचलण्यात आली आहेत.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकल्पाबाबत आग्रही भूमिकेत होते. हा प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा यासाठी त्यांनी विधानसभेत देखील आवाज उठवला होता तसेच पणन, कृषी, सहकार आणि इतर विविध विभागांच्या बैठकांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार बेनके हे प्रयत्नशील होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील याबाबत सकारात्मक भूमिकेत होते. अखेर आज दि .७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत श्री. कुकडेश्र्वर आदिवासी हिरडा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी देत २ कोटी रू. एकरकमी अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय घेतला आहे.

एकूण १२.५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून यासाठी शासनाने विशेष अनुदान म्हणून ४ कोटी रू. पैकी १ कोटी २१ लक्ष रू. याआधी दिलेले आहेत आणि यातील उर्वरित २ कोटी रू. एकरकमी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

तसेच हे अनुदान मिळाल्यानंतर आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून ७.९० कोटी रू. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मिळणार आहेत अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे.

कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून हिरडा या वनोत्पादनावर प्रक्रिया करून औषध तयार करण्यात येणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग करून जुन्नर तालुक्याच्या विकासास हातभार लावण्यासह आदिवासी बांधवांना उद्योजकतेकडे घेऊन जाणाऱ्या, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणाऱ्या सहकारी संस्थेस प्रोत्साहन देणे आवश्यक होते.

त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता. हा प्रकल्प आदिवासी भागातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. या माध्यमातून आदिवासी नागरिकांना रोजगार मिळणार असून शेतकऱ्यांना देखील हिरडा पिकाच्या उत्पादनातून उत्पन्न मिळण्यासाठी मदत होणार आहे असे यावेळी बोलताना आमदार बेनके यांनी सांगितले.

या प्रकल्पास चालना देण्यासाठी सरकारने निर्णय घेतल्याबद्दल आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पणन मंत्री अब्दुल सत्तार तसेच शासनाच्या सहकार, कृषी, पणन आणि वित्त विभागासह सबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे देखील आभार मानले आहेत.

तसेच या प्रकल्पासाठी पाठपुरावा करताना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात काम करणारे अनेक नेते आणि कार्यकर्ते संघर्ष करत होते. यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष काळूशेठ शेळकंदे, सचिव शिवाजीराव डोंगरे, मारुती वायाळ, रविंद्र तळपे, मनोज डोंगरे, नाथा शिंगाडे, रघुनंदन भांगे यांसह इतर अनेक नेते मंडळींनी प्रयत्न केले याबद्दल या सर्वांचे आभार आमदार बेनके यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे