हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीत पोलीस उपनिरीक्षक सामील
1 min read
पुणे दि.५:- ज्येष्ठ नागरिकांना हनी ट्रॅपमध्ये मोहजालात अडकवून लुटणाऱ्या टोळीत पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सामील झाल्याची धक्कादायक माहिती शनिवारी (दि. ३) उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ उभे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने यापूर्वीही या स्वरूपाचे अनेक गुन्हे केले असावेत, असा पोलिसांचा अंदाज असून, त्यादृष्टीने तपास जारी करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक उभे पसार झाला. तो न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी खटपट करीत असल्याची पोलिसांची माहिती आहे.
तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने त्याचा तपास जारी करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलीस दलातील आणखी काही नावे निष्पन्न होतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्याबाबत कसून तपास करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिले आहेत.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उभे याच्या साथीदार अवंतिका सचिन सोनवणे (वय ३५), पूनम संजय पाटील (वय ४०), आरती संजय गायकवाड (वय ५८, तिघी रा. कोथरूड) यांना अटक करण्यात आली. पूनम पाटील हिच्याविरुद्ध कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका डॉक्टरला ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली. कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला २९ जुलै २०२४ ला या टोळीने मोहजालात अडकवून एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर पोलीस आणि महिला हक्क आयोगाचे सदस्य असल्याचे सांगून या नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली.
बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याच्याकडील २० हजारांची रोकड व मोबाईल फोन आरोपींनी काढून घेतला.
या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.लक्ष्मी रस्त्यावरील ज्या हॉटेलमध्ये या नागरिकाला नेण्यात आले होते, तेथे महिलेने आधार कार्ड दिले होते. त्याआधारे माग काढत पोलिसांनी अवंतिका सोनवणे हिच्यासह पूनम पाटील, आरती गायकवाड यांना ताब्यात घेतले. हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात एक कार आढळून आली. ही कार मुळशीतील एका व्यक्तीच्या नावावर असून, पोलीस उपनिरीक्षक उभे ती वापरत असल्याचे उघड झाले.
उभे या कटात सामील असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर पोलीस दलातील अन्य कोणी या टोळीत सामील आहे किंवा कसे, याबाबत तपास जारी करण्यात आला आहे.काशिनाथ उभे गेली तीस वर्षे शहर पोलीस दलात नेमणुकीस आहे.
तो यापूर्वी राज्य दहशतवाद प्रतिबंधक विभागात (एटीएस) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. तेथे त्याला पोलीस उपनिरीक्षक म्हणून खात्यांतर्गत पदोन्नती मिळाली. सध्या तो पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे.