बेल्हे ग्रामसभा वादळी; अनेक मुद्दे उपस्थित करत ग्रामस्थ आक्रमक
1 min read
बेल्हे दि.२:- बेल्हे ता.जुन्नर गावची ग्रामसभा वादळी ठरली.अनेक मुद्दे ग्रामस्थांनी उघड करत ग्रामपंचायतीच पितळ उघड केलं. नळ कनेक्शन नसतानाही पाणी पट्टी कशी येते असा सवाल जागरूक ग्रामस्थांनी उपस्थित केला. तसेच गावच्या सार्वजनिक विहीर खोलीकरणात काढलेल्या गौणखनिजाला पाय फुटल्याचा प्रकार जागृत ग्रामस्थांनी ग्रामसभेत उघडकीस आणल्या नंतर ग्रामसेवकाची बोलती बंद झाली. रेशन घ्याण्यासाठी नागरिकांना तासनतास ताटकळत उभा राहावे लागते. परप्रांतीयांचा मुद्दा ग्रामस्थांनी चांगलाच लाऊन धरला. अशा अनेक मुद्यांवर ग्रामसभा वादळी ठरली..
गावच्या सार्वजनिक विहीरीचे विनापरवाना खोली करण करणे, गौणखनिज गायब करणे या संपुर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर खातेनिहाय चौकशी व्हावी, यात दोषी असलेल्या ग्रामसेवक एम.बी दुराफे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्याची कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
बेल्हे गावच्या पाणीसाठा वाढावा म्हणून लाखों रुपये खर्च करून सार्वजनिक विहिरीचे सोळा फूट खोलीकरण काम केले, यात मोठ्या प्रमाणात गौणखनिज (डबर) काढण्यात आले. ते गौणखनिज रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, ट्रकमध्ये भरून गायब करण्यात आले.
विहिरीत सोळा फूट खोलीकरणात किती गौणखनिज ब्रास गौणखनिज काढण्यात आले, त्या गौणखनिज उत्खननासाठी महसूल विभागाच्या संबंधित कार्यालयाची परवानगी घेतली होती का? त्या गौणखनिजाची किती रॉयल्टी दिली ?
त्या गौणखनिज विक्रीतून बेल्हे ग्रामपंचायतच्या बॅंक खात्यात किती रुपये जमा झाले? अशा विविध प्रश्नांची जागृत ग्रामस्थांनी ग्रामसभेत सरबत्ती करताच ग्रामसेवक एमबी दुराफे यांनी कानावर हात ठेवत मौन धारण करून काहीच माहिती नाही असा फार्स केला.
बेल्हे गावच्या सार्वजनिक विहिरीतून खोलीकरणातून काढण्यात आलेल्या गौणखनिज चोरी प्रकरणाची जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यां मार्फत खातेनिहाय चौकशी करून या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तीवर फौंजदारी गुन्हा दाखल करून दोषींना पदमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान मागासवर्गीय ग्रामस्थांसाठी आलेला १४ वा वित्तआयोगाच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावण्यामुळे वादग्रस्त ठरलेले ग्रामसेवक एमबी दुराफे गौणखनिज गायब करण्याच्या प्रतापाने अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत ग्रामसेवक एम.बी दूराफे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मौन धारण केल्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही.