वडज धरण कुकडी प्रकल्पातून वगळून फक्त जुन्नर तालुक्यासाठी करा:- प्रशांत पाबळे

1 min read

जुन्नर दि.२५:- भविष्यातील पाणी योजना व पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची गरज लक्षात घेता वडज धरण कुकडी प्रकल्पातून वगळून फक्त जुन्नरपुरते सीमित करावे. गाळ काढून धरणाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात गाळ टाकण्याची अनुमती द्यावी. अशी मागणी भारतीय किसान संघ युवाचे जुन्नर तालुकाध्यक्ष प्रशांत पाबळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणाचे आयुष्य किती वर्षे आहे, याचा विचार करून पुनर्निर्माण आणि खोलीकरण करणे गरजेचे आहे. धरण ज्या वेळेस झाले, त्या वेळेस कुसूर गावी जाण्यासाठी चांगला पूल होता. मात्र, सतत येणाऱ्या मातीमुळे तो नामशेष झाला आहे. धरणाच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी या मातीत गेल्या आहेत. त्यामुळे धरणक्षमता कमी झाली आहे. सध्या धरणात निम्मेसुद्धा पाणी साठत नाही. कागदावर धरण जरी १०० टक्के भरलेले दाखवत असले, तरी प्रत्यक्षात क्षमतेच्या ७० ते ७५ टक्केसुद्धा पाणी त्यात साठत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बारव, येनेरे अगदी मागील बाजूस तांबे इथपर्यंत पेयजल तसेच शेतीच्या पाण्याची गरज वाढली आहे. भविष्यात खोलीकरण व कुकडी पाणी वाटपातून हे धरण न वगळल्यास मोठा संघर्ष उभा राहू शकतो. २०२६-२७ कुकडी प्रकल्पातील येडगाव धरण जलसंचय साठ्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असेल; म्हणजेच कुकडी प्रकल्पाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणायला हरकत नाही. या साठी आत्ताच किंवा २०२४-२९ या कालावधीत विशेष पॅकेज घेऊन सर्व कालवे, धरणे यांच्यासाठी विशेष मोहीम राबविली पाहिजे. पवना धरणातून गाळ उपसा केला. शासकीय परवानगी घेऊन ७ वर्षे सातत्याने काम चालू आहे. फक्त राजकीय इच्छाशक्ती हवी. खडकवासला धरणाचाही गाळ काढण्याचे काम चालू आहे. त्याच धर्तीवर सर्वांनी करायला हवे आणि यासाठी जेवढे तालुके आणि जिल्हे कुकडीवर अवलंबून आहेत, त्यांनी सर्वांनी मदत करावी. वडज धरणातील गाळ लवकरात लवकर काढावा व वडज धरण कुकडीच्या पाणी नियोजनातून कायमचे काढून टाकून ते फक्त जुन्नरपुरते घोषित करावे, असे या निवेदनात पाबळे यांनी नमूद केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे