गुळूंचवाडी अपघातात गंभीर जखमी झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती धोंडीभाऊ पिंगट यांच दुःखद निधन; जुन्नर तालुक्यावर शोककळा
1 min read
बेल्हे दि.२०:- कल्याण- अहमदनगर महामार्गावर गुळूचंवाडी (ता.जुन्नर) येथे शुक्रवार दि.१९ रोजी झालेल्या अपघातात ट्रकखाली चिरडले गेलेले गंभीररीत्या जखमी झालेले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक धोंडीभाऊ पिंगट यांचे शनिवारी दि.२० रोजी सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले. धोंडीभाऊ पिंगट यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावाई, नातवंडे, दोन भाऊ असा मोठा परीवार आहे. त्यांच्या मृत्यूने जुन्नर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता धोंडीभाऊ पिंगट हे आज पाचवे बळी ठरले आहेत. अंत्यविधी उरकून बेल्हे घरी परतत असताना ट्रकखाली चिरडलेल्या जखमींमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती धोंडीभाऊ सदाशिव पिंगट हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर आळेफाटा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
धोंडीभाऊ पिंगट यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, संचालक, बेल्हे ग्रामपंचायत उपसरपंच, बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक या पदाची जबाबदारी संभाळली.