आणे पठार उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प अहवालासाठी ७६ लक्ष रूपयांची तरतूद:- उपमुख्यमंत्री अजित पवार
1 min readजुन्नर दि.२०:- जुन्नर तालुक्यातील आणे पठार उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प अहवालासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७६ लक्ष रूपयांची तरतूद करण्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आदेश जारी केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार अतुल बेनके यांनी दिली.
पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत झाला निर्णय पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या नियोजन संदर्भात आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठक आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन पुणे येथे पार पडली.
या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील विविध विकासकामांसंबंधी चर्चा करण्यात आली आणि विविध कामांना मंजुरी देण्यात आली.यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केलेल्या मागणीनुसार तालुक्यातील पूर्व भागातील आणे पठार उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प.
अहवालासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७६ लक्ष रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणे पठार उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत नळवणे, आणे, शिंदेवाडी, पेमदरा आणि शिंदेवाडी या प्रमुख गावांचा समावेश होतो.
याबाबत आ.अतुल बेनके यांनी सांगितले, आणे पठार उपसा सिंचन योजनेमुळे जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा आणि शिंदेवाडी या भागातील नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी आणि इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ७६ लक्ष रू. इतक्या निधीची तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज शनिवार दि.२० च्या बैठकीत जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला याबद्दल शासनाचे आणि अधिकारी वर्गाचे विशेष आभार देखील आमदार अतुल बेनके यांनी मानले.
या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री शरदचंद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांसह जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.