संगमनेर तालुक्यात बिबट्याने घेतला चिमुकलीचा बळी
1 min read
संगमनेर दि.११:- संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बिबट्याने दीड वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि.११ रोजी घडली. यामध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीच्या मानेवर बिबट्याचे दात लागल्याने ती जागीच ठार झाली.
ओवी सचिन गडाख असे या चिमुकलीचे नाव आहे. हिवरगाव पावसा गावात रोडच्या कडेला गडाख वस्ती आहे. ओवीचे आई-वडील हे शेती व दूध व्यवसाय करतात. दुपारी ओवीची आई चारा काढण्यासाठी मुलीला घेऊन घास कापण्यासाठी आली होती.
ओवीला शेताच्या बांधावर ठेवले. आई गायांसाठी घास कापत असताना ओवी बांधावर खेळत होती. याचवेळी बिबट्याने या चिमुरडीवर हल्ला करत तिला तोंडात धरून उचलून गवतात नेले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील येणाऱ्या शिक्षकांनी पाहिला. दरम्यान, पिडीत मुलीच्या आईने आरडाओरडा सुरू केला.
नागरिकांनी गवताकडे धाव घेतली असता बिबट्याने चिमुरडीला सोडले. त्यानंतर तत्काळ या चिमुरडीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत चिमुकलीने आपला जीव गमावला होता.