साळवाडी ते शिरोली काॅलनी रस्त्याची दुरावस्था
1 min read
बेल्हे दि.३:- जुन्नर तालुक्यातील साळवाडी ते शिरोली काॅलनी या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने “रस्ता की, मृत्यूचा सापळा”अशी अवस्था तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष घातलं जात नसल्याने ग्रामस्थांसह ,वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा रस्ता शिरोली, निमगावसावा, जांबुत या गावांसह, शिरुर तालुक्याला जोडला गेला आहे. हा रस्ता जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत आहे.
साळवाडी, गावठाण या भागातच मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रवाशी व वाहनचालकांना हा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने” खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा “अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. अनेकवेळा दुचाकीस्वारांना खड्डे वाचविताना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. शिरोली, निमगावसावा, पारगाव, जांबुत, शिरूर या गावांना जोडणारा हा जवळचा व सोईस्कर रस्ता आहे.
या भागातील लोकांचा वरील गावांशी दररोजचा संपर्क येत असतो. रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहेत.महिला, प्रवाशी, विद्यार्थी, रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे.सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, नाना शेटे, पांडुरंग शेटे, लक्ष्मण काळे यांनी मागणी केली आहे.