पुणे जिल्ह्यात बिबटग्रस्त क्षेत्रात २३३ गावे; संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र घोषित:- जिल्हाधिकारी सुहास दिवसे

1 min read

पुणे दि.२८:- पुणे जिल्ह्यातील बिबटग्रस्त असलेल्या २३३ अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी गुरुवारी केली. यामध्ये जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.जुन्नर वनविभागाच्या अखत्यारित येत असलेल्या भागात पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात माणसांचे झालेले मृत्यू आणि जखमींच्या घटना लक्षात घेता डॉ. दिवसे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने ही घोषणा केली आहे.

जिल्ह्याच्या उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यांचा जुन्नर वन विभागामध्ये समावेश आहे. यातील बहुतांशी क्षेत्र डोंगराळ असून, यामध्ये पाटबंधारे विभागाचे सिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये प्रामुख्याने घोड व कुकडी प्रकल्पांतर्गत येत असलेल्या माणिकडोह, पिंपळगाव जोगे, चिल्हेवाडी, चासकमान या धरणांचा समावेश आहे.या भागात पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब आदी दीर्घकालीन बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. या पिकांमध्ये बिबट्यांना लपण्यासाठी उत्तम निवारा आणि पाण्याची मुबलक उपलब्धता होत असते. शिवाय शेती व्यवसायाच्या निमित्ताने पाळीव प्राण्यांसह शेतातील मानवी वस्त्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बिबट्यांना या भागात पाळीव प्राणी भक्ष्य म्हणून सहज उपलब्ध होत आहेत. परिणामी या भागात बिबट्याचा अधिवास निर्माण झाला आहे. बिबट्यांचे वास्तव्य हे प्रामुख्याने ऊस शेतीत आहे. या प्रकरणी २३ वर्षांपासून वनविभागात मानव बिबट संघर्षामध्ये वाढ होत असल्याचे डॉ. दिवसे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे ४५० बिबटे असल्याची आकडेवारी देण्यात आली.■ डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने जुन्नर वनविभागाच्या हद्दीत केलेल्या अभ्यासामध्ये या क्षेत्रात बिबट वन्यप्राण्यांच्या संख्येची घनता ही प्रति १०० चौरस किलोमीटरमध्ये ६ ते ७ बिबटे इतकी आढळून आली आहे. तसेच बिबट्यांचे मानवावरील, पशुधनावरील हल्ले पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या ४०० ते ४५० असण्याची शक्यता आहे. जुन्नर वनविभागात पाच वर्षांत बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४० जण गंभीर जखमी व १६ जणांच्या मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे