श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य वाटप
1 min readबेल्हे दि.२८:- लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यालयाचे माजी विद्यार्थी महानगर बँक. मुंबईचे सेवानिवृत्त शाखाधिकारी कृष्णा बांगर यांच्या दातृत्वातून इयत्ता पाचवीत नव्याने प्रवेशीत झालेल्या विद्यार्थ्यांना १३६ दफ्तरांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक आरक्षणाचे प्रणेते प्रजाहितदक्ष लोकराजे राजर्षी शाहू महाराज.
थोर शिक्षण महर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील तसेच रयत माऊली कै. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजित अभंग यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाबरोबरच राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांतूनच आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण झाली आहे. विद्यार्थ्यांनी या महान व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घ्यावी”, असे प्रतिपादन अजित अभंग यांनी केले.अनुष्का गाडगे व प्रज्वल पिंगळे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त रयत सेवक बबन पिंगट यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कतज्ञतेची भावना ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी बाळासाहेब बांगर, शिवाजी औटी, आशा बांगर, सुलोचना बांगर आदि मान्यवर उपस्थित होते.द्रौपदी धराडे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.