श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

बेल्हे दि.२१: – रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिम्मित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक तथा विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व समजावून सांगितले. योगातून आपले शरीर व आपले मन यांच्यात एकरूपता साधली जाते. चित्तवॄत्ती प्रसन्न होतात. याचा उपयोग आपल्याला अभ्यासात होतो.
असे प्रतिपादन त्यांनी केले. योग दिन केवळ एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी दररोज प्रत्यक्ष अध्ययनाला सुरुवात करण्यापूर्वी पाच मिनिटे ध्यानधारणा करावी, असे आवाहन प्राचार्य अजित अभंग यांनी विद्यार्थ्यांना केले.
योग प्रशिक्षक उपशिक्षक प्रशांत पादीर यांनी योग प्रत्यक्षिकांचे संचलन केले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून क्रमश: कृती करवून घेतल्या. कला शिक्षक सुनील गटकळ यांनी योग प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तम साथ दिली.
या प्रसंगी वृक्षासन, ताडासन, मयुरासन, त्रिकोणासन, भुजंगासन, पद्मासन, चक्रासन, इत्यादि योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ध्यानमुद्रा धारण करुन ध्यान केले. अनुलोम विलोमासह प्राणायाम केले. उपशिक्षक बाळासाहेब गावडे यांनी हास्ययोगाची प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थितानी हास्ययोगाला उत्स्फूर्त दाद दिली.