रिक्षावर दगड कोसळून काका- पुतण्या दोघे जागीच ठार
1 min read
माळशेज दि.१२:- माळशेज घाटात प्रवासी रिक्षावर दरडीचा एक मोठा दगड कोसळून रिक्षातील दोघांचा जागीचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात वर्षांच्या बालकाचा समावेश असून, एक महिला जखमी झाली आहे. मंगळवारी (दि.११) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटातील मंदिर व बोगदा यादरम्यान ही दुर्घटना घडली.
सोयम सचिन भालेराव (वय ७) व राहुल बबन भालेराव (वय ३५, दोघेही रा. चंदनापुरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत. दुर्घटनेनंतर दोन्ही मृतदेह आणि जखमी महिलेला त्याच रिक्षातून ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथे जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या रिक्षात एकूण पाच प्रवासी प्रवास करीत होते. माळशेज घाटातील मंदिर व बोगदा
यादरम्यान अचानक दरडीचा मोठा दगड रिक्षावर कोसळला. त्यात सोयम आणि राहुल यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. मृत मुलाचे वडील रिक्षा चालवत होते. ते आणि अन्य एक जण या दुर्घटनेत बचावले.
दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे रिक्षाचालक असलेल्या वडिलांना भोवळ आल्याने ते ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोसळल्याचे समजते. या दुर्घटनेबाबत आणे माळशेज पट्ट्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.