वाट चुकलेल्या वाटसरूला खामुंडी ग्रामस्थ व पोलिसांचा आधार

1 min read

खामुंडी दि.२५:- खामुंडी (ता.जुन्नर) येथे ता.२३ रोजी सकाळचे सुमारास एक अनोळखी इसम अचानक अवतरला प्रथम दर्शनी तो मानसिक रुग्णासारखे हावभाव करून फिरत असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके याच्या निदर्शनास आले. त्याची विचारपूस केली असता त्यास ऐकू येत नव्हते तर व्यवस्थित बोलता देखिल येत नव्हते,

परिणामी त्याची ओळख पटवणे मोठे जिकिरीचे काम होते परंतु म्हणतात ना संकटात अडकलेल्यांना देव कुणाला तरी मदतीसाठी पाठवतच असतो, अगदी तसेच घडले. कैलास बोडके यांनी आपले मित्र नितीन शेलार यांना या व्यक्तिबाबत माहिती दिली.

या दोघांनी त्यांच्या बुद्धीचतुर्याने त्या व्यक्तीस बोलते करण्याचा प्रयत्न केला बराच वेळ प्रयत्न करून त्याचे नाव आणि पत्ता विचारला त्या इसमाने त्याचे नाव सुरज असल्याचे मोडक्या तोडक्या भाषेत सांगितले मात्र याबाबत बाकीची माहिती मिळू शकली नाही म्हणून त्याला आधारासाठी अहमदनगर येथील मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्याचे ठरवले.

बोडके यांनी सदर बाब ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस हवलदार महेश पटारे, संदीप लांडे यांना संपर्क साधून या इसमाबाबत माहिती सांगितली, ओतूर पोलिसांनी देखील दुजोरा देत त्याची तात्काळ दखल घेत खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन दिले.

ओतूर पोलिसांनी नगर येथील मानवसेवा प्रकल्प सेवा संस्थेत या इसमास दाखल करण्यासाठी आवश्यक तो पत्रव्यहार केल्या नंतर सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके, नितीन शेलार व ज्योती शेलार हे स्वतः त्या इसमाला घेऊन अहमदनगर येथील अरनगाव मानवसेवा प्रकल्पात पोहचले, सदर प्रकलपात नागरिकांना निशुल्क सेवा मिळत असून व्यवस्थापक दिलीप गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या इसमास उपचारकामी दाखल करण्यात आले.

इसमावर योग्य ते उपचार करून त्याला त्याचे घर शोधून त्यास स्वगृही सोडले जाईल असे आश्वासन संबधित संस्थेकडून मिळाले. बोडके व शेलार यांनी अद्यापपर्यंत अनेकांना मदतीचा हात दिलेला आहे. त्यांच्या या सामाजिक कामाबाबत त्यांचेवर सर्वच स्थरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे