बचत गटाच्या माध्यमातून ‘पुण्यश्री किराणा सुपर मार्केटची’ १ कोटींची उलाढाल; साडेपाच लाख रुपयांचा नफा; पुणे विभागीय आयुक्तांनी दिली भेट
1 min read
ओतूर दि.९:- जुन्नर तालुक्यातील ओतूर, पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत श्री क्षेत्र ओझर नं.२ येथे उमेद अभियान अंतर्गत स्थापन” पुण्यश्री किराणा सुपर मार्केट” येथे सदिच्छा भेट देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद पुणे चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा शालिनी कडू तसेच सचिन सूर्यवंशी (गट विकास अधिकारी, जुन्नर) तसेच पंचायत समितीचे सर्व अधिकारी व उमेद स्टाफ , समूहातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेद अंतर्गत स्थापन “पुण्यश्री सुपर मार्केट मध्ये भेट देऊन पाहणी केली, तसेच महिला बचत गटामार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंची पाहणी केली. सदर पुण्यश्री सुपर मार्केट उमेद अभियान अंतर्गत स्थापन भाग्यलक्ष्मी समूहातील महिलांमार्फत चालविले जाते, या पुण्यश्री उपक्रमाची सुरुवात एक वर्षापूर्वी करण्यात आली.
या एक वर्षाच्या कालावधीमध्ये या पुण्यश्री किराणा सुपर मार्केटची उलाढाल ही एक कोटी रुपयांची झालेली असून आतापर्यंत याद्वारे साडे पाच लाख रुपये इतका नफा प्राप्त झालेला आहे, तसेच या उपक्रमात सहभागी असणाऱ्या महिला या एकत्रितरित्या या ठिकाणी काम करतात तसेच याच दुकानांमध्ये प्रत्येकीचे वैयक्तिक व्यवसाय देखील चालवले जातात.
यामध्ये प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, सेंद्रिय भाजीपाला विक्री,पीठ गिरणी, टेलरिंग काम, कास्य थाळी, बी. सी.सेंटर हे वैयक्तिक व्यवसाय देखिल याच सुपर मार्केट मध्ये सुरु कऱण्यात आलेले आहेत , या व्यतिरिक्त बचत गटामार्फत तयार/उत्पादित केलेल्या वस्तू/पदार्थ याच ठिकाणी विक्रीसाठी ठेवले जातात त्यामुळे या समूहांना वस्तू विक्रीसाठी उत्तम जागा /संधी प्राप्त झाले आहे.
आणि त्यामुळे या महिलांना उत्पन्नाचे/उपजीविकेचे एक चांगले साधन निर्माण झाले आहे. या सदिच्छा भेटीदरम्यान पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला यामध्ये प्रामुख्याने बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू यांची विक्री व्यवस्थापन तसेच क्षमता बांधणी/ प्रशिक्षण यांचे नियोजन कसे करता.
येईल तसेच गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना चांगला भाव/ मार्केट कसे मिळेल, उत्तम विक्री व्यवस्थापन कसे करता येईल, याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. या पुण्यश्री उपक्रमाचे कामकाज कसे चालते, हिशोब कसा ठेवला जातो , व्यवस्थापन कसे केले जाते.
याबाबत माहिती जाणून घेतली व या उपक्रमाबाबत सहभागी सर्व महिलांचे कौतुक करण्यात आले व करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.