संदिप हरियाणा ठरला हर हर महादेव आळे केसरी; लाखो भाविकांनी घेतले रेडा समाधीचे दर्शन
1 min read
बेल्हे दि.६:- श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या श्री क्षेत्र आळे (ता.जुन्नर) येथील रेडा समाधी यात्रौत्सवाच्या निमित्ताने भव्य अश्या कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.
यंदा ची यात्रा अतिशय उत्साहात पार पडली असून यात्रा कालावधीमध्ये लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. चार दिवस चाललेल्या या यात्रेत शासकीय महापुजा संपन्न झाली. त्यानंतर भव्य पालखी सोहळा, भजन महोत्सव, तुकाई माता विठ्ठल भक्त प्रासादिक भजन,
भारूड मंडळाचा भारूडाचा कार्यक्रम तर ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, ह.भ.प.विशाल महाराज हाडवळे, ह.भ.प.सुदाम महाराज बनकर यांची कीर्तने झाली. तर यात्रेच्या तिस-या दिवशी घेण्यात आलेल्या कुस्त्यांच्या आखाडयात अंतीम कुस्तीची संदिप हरियाणा व आकाश चव्हाण यांच्यात झाली.
या लढतीत आळे केसरी २०२४ च्या मानाच्या गदेचा मानकरी संदीप हरियाणा ठरला. २५ हजार रुपये व मानाची चांदीची गदा असे बक्षिसाचे स्वरूप होते. विशेष म्हणजे मानाच्या गदे साठी झालेल्या लढतीसाठी ८ पैलवान निवडण्यात आले होते व या आठ मधुन चार कुस्त्या झाल्या परत चार विजेत्यांमध्ये दोन कुस्त्या झाल्या
व या दोन मधून शेवटची मानाची लढत झाली. या लढतीसाठी मानाची गदा कै. बबन कमलाकर भुजबळ यांच्या स्मरणार्थ संतोष भुजबळ व सुभाष भुजबळ यांच्याकडून देण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा परीषदेचे सदस्य शरद लेंडे, दिलीप कोल्हे, शाम माळी, आळे गावचे सरपंच प्रितम काळे, उपसरपंच ॲड. विजय कु-हाडे, आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सतीष होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, रागिणी कराळे,अनिल पवार, अशोक फलके, नवनाथ निमसे,दिनेश सहाने, मंगेश काकडे, तुषार सहाणे
आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या कुस्ती आखाडय़ात २५० लहान मोठया कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. विशेष आकर्षण ठरले ते मुलींची रोमहर्षक कुस्त्या. या मुलींनी उपस्थितांची प्रेक्षकांची मने जिंकली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मल्ल आले होते तर ३० ते ४० महिला पैलवानांनी सुद्धा या हंगामामध्ये उपस्थिती दर्शवली.
महिलांची ही अटीतटीच्या लढती झाल्या. यावेळी समालोचन, निलेश भुजबळ, जीवन शिंदे, निलेश शिंदे, उदय पाटील भुजबळ, यांणी केले तर पंच म्हणून गोपीचंद मेहेर, संजय भुजबळ, पप्पू डोंगरे, सुभाष डोके यांनी काम पाहीले.