रांजणगावच्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले; हातावरील टॅटूच्या आधारे आरोपीचा शोध

1 min read

पुणे दि.८:- पुण्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10 दिवसांपूर्वी जळालेल्या अवस्थेत तीन मृतदेह सापडले होते. त्याचे गूढ अखेर उकलण्यात यश आले आहे. पोलिसांनी मृत अज्ञात महिलेची आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. गोरख बोखारे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली असून. अनैतिक संबंधातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृत महिलेच्या नातेवाईकानेच हे तिनही खून केल्याचे उघड झाले आहे. 25 मे रोजी खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले होते. स्वाती केशव सोनवणे (25), स्वराज (3) आणि विराज (1 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. आरोपीने महिलेची आणि दोन मुलांची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहांवर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते.मृत स्वाती ही आरोपी गोरखच्या चुलत मामाची मुलगी होती. स्वाती आणि तिच्या नवऱ्यामध्ये कायम भांडणे होत होती. त्यांचे वाद नेहमी गोरख सोडवत होता. त्यातूनच त्याचे आणि स्वातीचे प्रेमसंबंध जुळले. स्वातीने सतत गोरखकडे लग्नाचा तगादा लावला होता. एकदिवस आरोपीने मोटरसायकलवर स्वाती सोनवणे व तिच्या दोन्ही मुलाना आळंदीतून घेऊन सरहद वाडी शिरूर येथे घेऊन आला. तिथे त्याने स्वातीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाले. दोन्ही मुलं झोपेत असताना गोरखने स्वातीचा गळा आवळून खून केला. तसंच, दोन्ही मुलांचाही जीव घेतला.मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिघांच्याही मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. नंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर तो नेहमी प्रमाणे रांजणगाव येथील एका कंपनीमध्ये गाडीवर चालक म्हणून काम करत राहिला. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक काम होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या हातावर असलेल्या टॅटूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवली आणि आरोपीचा शोध घेतला. आरोपी हा मृत महिलेच्या बहिणीचा दीर आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!