विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी
1 min read
बोटा दि.२८:- विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय, बोटा येथे भारताचे माजी राष्ट्रपती व ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल मुळजकर उपस्थित होते. त्यांनी डॉ. कलाम यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन ज्ञान, संशोधन, नवोपक्रम आणि राष्ट्रसेवा यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन केले.
यावेळी प्राध्यापिका ज्योती देशमुख यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सकारात्मक विचार आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण केली असून, त्यांचे विचार आजही तरुणांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत फटांगरे, एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष पवार, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण शिंदे, कॅम्पस डायरेक्टर दीपक रहाणे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा अंगीकार करून राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
