पालक-शिक्षक संवादासाठी व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक सभेचे आयोजन

1 min read

वडगाव कांदळी दि.८:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे दि. 5 जून व 6 जून रोजी प्री-प्रायमरी (पूर्व प्राथमिक) ते इयत्ता दहावीपर्यंत सर्व वर्गांसाठी पालक सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या पालक सभेचा प्रमुख उद्देश शैक्षणिक वर्ष 2025–26 मधील शालेय धोरणे, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे बदल, अध्यापनाच्या आधुनिक पद्धती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे उपक्रम तसेच पालक व शिक्षक यांच्यात सशक्त संवाद घडवून आणणे हा होता. या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी उपस्थित पालकांना सर्वप्रथम शाळेविषयी ओळख करून दिली. तसेच पालकांना अभ्यासक्रम नियोजन, मूल्याधिष्ठित शिक्षण, डिजिटल शिक्षण साधनांचा वापर, मूल्यमापन पद्धती, तसेच सहशालेय व सह अभ्यासक्रम उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी शाळा कोणत्या पद्धती वापरणार आहे, याची विस्तृत माहिती पालकांना देण्यात आली.इ.2 री ते इ.10 वी या वर्गांसाठी स्वतंत्र तसेच इ. नर्सरी ते इ.1ली या वर्गांसाठी स्वतंत्र वेळापत्रकानुसार सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी मोठ्या उत्साहाने या सभेला प्रतिसाद दिला. अनेक पालकांनी शिक्षकांशी थेट संवाद साधून आपल्या शंकांचे समाधान केले तसेच सहकार्याची ग्वाही दिली. नवीन शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये शाळेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेले नवीन IIP म्हणजेच इंटरॅक्टिव्ह इंटेलिजन्स पॅनल शिक्षण प्रणाली मध्ये अध्यापनासाठी व अध्ययनासाठी कसे उपयुक्त आहे. यासंबंधीचे प्रात्यक्षिक शिक्षक अमोल जाधव यांनी दिले. पालकांनीही सर्व माहिती जाणून घेतली.या पालक सभेसाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच खजिनदार शिवाजी बांगर यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अशा प्रकारच्या पालक सभांमुळे शाळा व पालक यांच्यातील बंध अधिक दृढ होत असल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले. पालक सभेच्या यशस्वीतेसाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे