कल्याण – नगर महामार्गावर भीषण अपघात; चौघे ठार

1 min read

माळशेज दि.५:- नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज येथील आवळेवाडीनजीक शुक्रवार दि.३ टेम्पो आणि टँकरचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन्ही वाहनांच्या चालकांसह, तर टँकरमधून प्रवास करणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. यात पाच वर्षाचा मुलगा अपघातात सुदैवाने बचावला.

मात्र, तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये टँकरचालक दत्तात्रय किसन वामन (रा. मंगरुळ, ता. जुन्नर), टेम्पोचालक शकील अमजद शेख (रा. जुन्नर), तसेच अक्षय शांताराम दिघे (वय ३४) त्यांची पत्नी तेजल अक्षय दिघे (वय २८ रा. पांगरी तर्फे मढ) असा एकूण चौघांचा समावेश आहे.

त्यांचा अंदाजे तीन ते पाच वर्षांचा मुलगा अपघातात जखमी झाला आहे. टोकावडेचे पोलिस निरीक्षक दिनकर चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास झाला. या प्रकरणी टेम्पोचा क्लिनर जयअब्दुल पठाण याने फिर्याद दिली आहे.

मृत दिघे दांपत्य गावाकडील लग्न समारंभ सोहळा आटोपून दुधाच्या टँकरमधून (एम.एच.४६ ए.एफ ३७७०) मुंबईकडे चालले होते. तर तरकारी वाहतूक करणारा टेम्पो (एम.एच १४ सीडी ३७७०) जुन्नरकडे येत होता.

या दोन्ही वाहनांची आवळेवाडी नजीक समोरासमोर धडक झाली. त्यात टँकरचे स्टेअरिंग लॉक झाले आणि तो घाटातून खाली गेला. धडक जोरात बसल्याने दोन्ही वाहनांच्या केबीनचा चक्काचूर झाला.

या घटनेत दोन्ही वाहनचालकांचा मृत्यू झाल्याचे पोलिस कर्मचारी पांडुरंग बगाड यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे