बैलगाडी विहिरीत कोसळून बैल ठार, प्रसंग अवधान राखल्याने शेतकरी वाचला
1 min readओतूर दि.३:- खामुंडी (ता. जुन्नर) येथील तेलदरा शिवारात बुधवारी (दि.१) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अज्ञात आवाजाला घाबरून बैल बिचकल्याने बैलगाडी सुमारे ६० ते ७० फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळली. त्यात बैल जागीच ठार झाला. प्रसंगावधान राखीत बैलगाडीतून उडी मारल्याने बैलगाडी चालविणारा शेतकरी वाचला. प्रणव कोकाटे (वय २२) असे त्याचे नाव आहे.प्रणव कोकाटे हे बैलगाडीतून चारा आणण्यास शेतात गेले होते. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोणत्यातरी आवाजाने बैल बिथरून उधळला. त्यामुळे बैलगाडी बैलासह विहिरीत कोसळली. आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांनी दुर्घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांच्याशी संपर्क साधून दिली. बोडके यांनी आळेफाटा येथील क्रेनमालक कैलास पुरी यांना याबाबत कळवून क्रेन बोलावली. शेतकरी दीपक कोकाटे, त्यांचा मुलगा बाबू कोकाटे यांनी क्रेनच्या साहाय्याने खाली विहिरीत उतरून खामुंडी गावातील तरुणांच्या मदतीने अथक प्रयत्न करून बैलाचा मृतदेह आणि बैलगाडी गुरुवारी रात्री १:३० च्या सुमारास विहिरीतून बाहेर काढली.