जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्यात चिमुकला ठार; नागरीक संतप्त
1 min read![](https://shivneriexpress.in/wp-content/uploads/2024/05/IMG-20240508-WA0062-1024x768.jpg)
जुन्नर दि.८:- जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तालुक्यामध्ये दहशतीच वातावरण पसरला आहे.
आज बुधवार (दि. ८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काळवाडी येथे घराच्याबाहेर अंगणात खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलावर बिट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात मुलगा ठार झाला आहे.
रूद्र महेंद्र फापाळे (वय ८ वर्ष, रा. बेलापूर ता अकोले जि अहमदनगर) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. काळवाडी (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत कालिकामाता यात्रा उत्सव मंगळवार (दि ७) पासून सुरु झाला आहे. रूद्र हा त्याचा मामा सचिन रोहिदास काकडे यांच्याकडे यात्रेसाठी आला होता.
रुद्र सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घराच्या ओट्यावर काही मुलांसोबत खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला व त्याला बाजूला असलेल्या उसाच्या शेतात घेऊन गेला. या हल्ल्यात या बालकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओतुर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्यासह वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.याच आठवड्यात सोमवारी (दि ६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पिंपळवंडी येथील लेंडेस्थळ शिवारात शेतात काम करणा-या.
आश्विनी मनोज हुलवळे या २४ वर्षीय शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा काळवाडी येथे बिबट्याने लहान बालकावर हल्ला करुन ठार केल्यामुळे परिसरात वनखात्याबाबत संतापाची लाट उसळली आहे.