एसटी बस-ट्रकचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, ९ गंभीर
1 min read
नाशिक, दि.१ – नाशिक जिल्ह्यातील चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस व ट्रकची जोरदार धडक झाली. अपघातात चार जणांचा मृत्यू तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच १५ हून अधिक जण किरकोळ जखमी झाले आहे.मृतांची नावे पुढीलप्रमाणे:- आतापर्यंत दोन मृत प्रवाशांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. साई संजय देवरे (१४, रा. उमराणे, ता. देवळा, जि. नाशिक), बळीराम सोनू आहिरे (६४, रा. प्लॉट नंबर ७ शांतीवन, कॉलेज रोड, नाशिक), सुरेखा सीताराम साळुंखे (५८), सुरेश तुकाराम सावंत (२८, रा. मेशी, डोंगरगाव ता. देवळा, जि. नाशिक) अशी त्यांची नावे आहेत.
मंगळवार दि.३० सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव ते वसई जाणारी बस व ट्रक यांच्यात हा अपघात राहुड घाटात घडला होता. या अपघातात एका लहान बालकाचाही समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक व पोलिसांनी मदतकार्य करून जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर गंभीर रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.भरधाव वेगात असलेल्या एसटीला एका ट्रकने डाव्या बाजूने धडक दिली. बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. बसच्या पुढील बाजूला डावीकडे ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांना सावरण्यासाठीही वेळ मिळाला नाही, आणि अनेकजण बसच्या बाहेर फेकले गेले.