आण्यात कुस्तीगीर मुलींनी गाजवला आखाडा

Oplus_131072
आणे दि.११ : आणे (ता.जुन्नर) येथे श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने भरविण्यात आलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात जुन्नर, पारनेर, संगमनेर, अहील्यानगर, श्रीरामपूर, राजगुरुनगर आंबेगाव अशा अनेक तालुक्यातून आलेल्या पैलवानांनी कुस्ती करून मैदान गाजवले.
यावर्षी येथील आखाड्यात महिला कुस्तीगिरांचा सहभाग उल्लेखनीय होता. राज्य पातळीवर खेळणाऱ्या अनेक पैलवान मुलींनी रोमहर्षक कुस्ती करून कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
दरवर्षी हिंदू नववर्षाच्या प्रथमदिनी गुढी पाडव्याचं औचित्य साधुन आणे ग्रामस्थ व देवस्थान संस्थेच्या वतीने हा आखाडा भरविण्यात येतो.
पंचक्रोशीतील यात्रांचा व कुस्तीच्या आखाड्याचा हंगाम या आखाड्यापासून सुरू होत असल्याने मुहूर्ताची कुस्ती खेळण्यासाठी नामांकित पैलवान दूरवरून येथे कुस्ती खेळण्यासाठी येत असतात.
नवीन वर्षातील पहिलाच आखाडा असल्याने कुस्ती शौकीन प्रेक्षकांचा येथे चांगला प्रतिसाद मिळतो. पै. विजय दाते व पै. पांडुरंग गाडेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. हनुमंत आहेर, पोपट दाते व बाबुराव दाते यांनी कुस्त्या जुळविण्याचे काम केले.
अमित आहेर व शंकर आहेर यांनी उत्तम समालोचन केले. देवस्थान संस्थेचे उपाध्यक्ष अनिल आहेर, संचालक दत्तात्रय शिंदे, ज्ञानेश्वर दाते, अंकुश दाते,
नितीन आहेर, विनायक आहेर, रंगनाथ आहेर, संजय दाते, बाळासाहेब दाते, प्रकाश दाते, प्रशांत दाते, किशोर आहेर, पो.पा. स्वप्नील थोरात आदी ग्रामस्थांनी आखाड्याचे उत्तम नियोजन केले होते.