जुन्नर तालुक्यात धक्कादायक प्रकार; ज्यूस सेंटरमधील बर्फाच्या लादीत आढळला मृत उंदिर; शीतपेय पिताय सावधान
1 min read
बेल्हे दि.१०:- बेल्हे येथील बर्फाच्या लाद्या विकणाऱ्या व्यावसायिकाकडील बर्फाच्या लादीत मृत उंदिर सापडला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कडाक्याच्या उन्हात बर्फ टाकून बनवलेले शितपेय पिणार असाल तर सावधान राहण्याची गरज आहे. कारण जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे विक्री करण्यात येणाऱ्या एका बर्फाच्या लादीत चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे.
हाच बर्फ टाकून अनेक ठिकाणी ग्राहकांना सरबत, गोळा, ऊसाचा रस अशी पेय देण्यात आली आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे. विक्रेत्याने तशीच बर्फाची लादी विकल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला.
बेल्हे (ता. जुन्नर) येथील बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यात सुरू असलेल्या ज्यूस सेंटरमधून बर्फाच्या लाद्यांची विक्री केली जाते. ज्यूस विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीत मृत उंदीर आढळून आला
सध्या राज्यात सगळीकडे उन्हाचा कडाला वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक आता शीतपेय आणि आईस्क्रीम खाण्यासाठी गर्दी करत आहेत.
अनेकजण बर्फाचा गोळा, फळांचे रस, ऊसाचा रस किंवा सरबत अशा गोष्टी विकत घेऊन पितात. विशेष म्हणेज, त्यानंतरही विक्रेत्याने ती बर्फाची लादी बेल्ह्यातील रसवंती गृह, लिंबू सरबत हातगाडी, गोळे बनवणाऱ्या व्यावसायिकांना विकल्याची धक्कादायक बाब जागृत ग्रामस्थांमुळे उघडकीस आली.
या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, संबंधित विक्रेत्याविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
कडाक्याच्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना नागरिक थंड शितपेय पिण्याला पसंती देतात खरं. मात्र या शितपेयात वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा दर्जा काय आहे? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होते.