दिलीप वळसे पाटीलच्या विद्यार्थ्यांनी केली ‘ग्राम स्वच्छता’
1 min read
बेल्हे दि.९:- निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे गावालगत वाहणाऱ्या कुकडी नदीचे पाणी आटल्याने नदीपात्र उघडे पडलेले आहे. या नदीपात्राची दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता करत पात्र चकाचक केले.
नदीपात्रातील प्लॅस्टिक, गवत, झाडाझुडपांच्या फांद्या, कागद, जुनाट कपडे यासारखा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. तसेच स्मशानभूमी येथील परिसराची ही स्वच्छता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली.
नदीच्या किनाऱ्यावर असणारे शंभू महादेव मंदिर, संत मनाजीबाबा समाधीस्थळ मंदिर, गुरुदेव दत्त मंदिर या मंदिर परिसरामध्येही स्वच्छतेचा उपक्रम विद्यार्थ्यांनी हाती घेऊन गावच्या ग्रामपंचायत परिसर आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातही स्वच्छता करून ‘ ग्राम स्वच्छतेचा’ संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून ग्रामस्थांना दिला.
तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छता रॅली काढून विविध घोषणांनी स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले. या ग्रामस्वच्छता उपक्रमासाठी निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, श्री पांडुरंग ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार आणि त्यांचे सहकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मा.सरपंच किशोर घोडे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या ग्रामस्वच्छता उपक्रमामध्ये महाविद्यालयाचे ६४ विद्यार्थी आणि प्रा.नीलम गायकवाड, प्रा.प्रवीण गोरडे, प्रा. विजय काळे, प्रा. माधुरी भोर, प्रा.अश्विनी जोरे हे प्राध्यापक यांच्या सहकार्याने आणि प्रा.शिवाजी साळवे यांच्या उत्कृष्ट नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला.
महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी केलेल्या या ग्रामस्वच्छता उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी कौतुक केले.
महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाल्याची माहिती प्रा.अनिल पडवळ यांनी दिली.