बिबट्या तब्बल १ तास रहिवाशी इमारतीत; बिल्डिंग च्या टेरेस वर बिबट्या; बिबट्याचा थरार कॅमेऱ्यात कैद; बघ्यांची मोठी गर्दी
1 min read
बेल्हे दि.२७:- आळेफाटा बस स्थानकाजवळ असलेल्या इमारतीमध्ये बिबट्या घुसल्याने परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली. पुणे नाशिक महामार्गावरील आळेफाटा (ता. जुन्नर) चौकाजवळ मंगळवार (दि. २६) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जवळपास सव्वा तासानंतर हा बिबट्या या इमारतीतून बाहेर निघून लगतच्या शेतात पळून गेला. या बिबट्याच्या हल्यात वनकर्मचारी कैलास भालेराव व दुसरा एक व्यक्ती या झटापटीत जखमी झाला. आळेफाटा चौकापासून अवघ्या काही अंतरावर रात्री ९ वाजता हा बिबट्या पुणे-नाशिक महामार्ग ओलांडत होता. या वेळी त्याची एका दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार रामजी वर्मा हा जखमी झाला. धडकेनंतर बिबट्या थेट बाजूच्या पांडुरंग नरवडे यांच्या पांडुरंग कृपा या इमारतीमध्ये घुसला.
त्यामुळे रहिवाशांची मोठी घाबरगुंडी उडाली. त्यांनी दरवाजे लावून घेतले. त्यानंतर हा बिबट्या जिन्याने थेट टेरेसवर गेला.बिबट्या इमारतीमध्ये घुसल्याची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली. वन विभागाचे वनरक्षक कैलास भालेराव यांच्यासह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.
दुसऱ्या बाजूने इमारतीवर चढून त्यांनी बिबट्यास खाली हुसकावले. मात्र बिबट्याने खाली येत असताना पत्र्याच्या शेडवर उडी मारून आश्रय घेतला. जवळपास सव्वा तासानंतर बिबट्या इमारतीतून बाहेर आला व लगतच्या शेतात धूम ठोकली, तेव्हा कुठे रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.