बिबट्याच्या हल्यात उंब्रज येथे चिमुकला गंभीर जखमी
1 min read
आळेफाटा दि.१२:- उंब्रज नं.१ (ता. जुन्नर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार वर्षीय आयुष सचिन शिंदे हा बालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. ११) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
आयुष हा घराच्या अंगणात खेळत असताना घराच्या बाजुलाच असलेल्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. यावेळी आयुषच्या वडिलांनी व आईने जोरजोरात आवाज केल्याने बिबट्याने बाळाला तेथेच सोडून पळ काढला.
या घटनेत आयुषच्या मानेला बिबट्याचे दात लागले असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. आयुषवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आयुष व त्याच्या परिवाराची भेट घेत चौकशी केली.