कांदळी येथील बिबट्याच्या हल्यात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून १० लाखाची तातडीची मदत
1 min read
बेल्हे दि.७:- कांदळी (ता. जुन्नर) येथे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात मंगेश गुंजाळ या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी वनविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि वन विभागाच्या माध्यमातून मंगेश च्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
या आवाहनानुसार वन विभागाच्या माध्यमातून मंगेशच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत देण्याचे घोषित करण्यात आले. या पैकी १० लाख रुपयांचा धनादेश गुरुवार दि.७ रोजी मंगेश च्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या मंगेश गुंजाळ या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. संतोष गुंजाळ व अक्षय महाले हे दोघेजण मंगेश याच्या पाठीमागून मोटारसायकलवर येत होते.
मंगेश याच्यावर बिबट्याचा हल्ला होत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला या घटनेत मंगेश याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. या तरुणाचा मंगळवार दि.५ रात्री उपचरादरम्यान मृत्यू झाला होता.
सध्या मानव बिबट संघर्ष वाढत चाललेला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी आपण शासनाकडे प्रश्नही मांडले आहेत, या सर्व परिस्थितीत सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी शेतात काम करताना सतर्क राहणे आणि काळजी घेणं आवश्यक आहे.
“मंगेशचे जाणं हे दुर्दैवी आहे. गुंजाळ कुटुंबाला या दुःखात आधार देणं सावरणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या आर्थिक मदतीच्या माध्यमातून गुंजाळ कुटुंबाला पुन्हा उभारी घेण्यासाठी मदत होईल व तसेच भविष्यात इतर काही गरज भासल्यास मी स्वतः या कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभा आहे.”
अतुल बेनके, आमदार