जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
1 min readनारायणगाव दि.१२:- जुन्नर चे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे रविवारी (दि.११) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व शेकडो जनतेच्या उपस्थितीत शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरीची सलामी देत हजारो नागरिकांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अंत्यविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे, आमदार रुपेश जगताप, आमदार निलेश लंके, आमदार दिलीप मोहिते, आमदार अशोक पवार,
खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, ‘विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार बाळासाहेब दांगट.
माजी आमदार दिलीप ढमढेरे, मनसे तालुका अध्यक्ष मकरंद पाटे, भाजपा नेत्या आशा बुचके, तसेच विविध पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. वल्लभ बेनके यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्यातील निष्ठावान सहकारी गमावला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तर जुन्नरच्या विकासात बेनके यांचा मोलाचा वाटा होता.
आमदार अतुल बेनके, वल्लभ बेनके यांच्या पत्नी राजश्री बेनके, डॉ. अमोल बेनके, अमित बेनके व परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. वल्लभ बेनके यांच्या निधनामुळे जवळचा सवंगडी गमावल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
काय म्हणाले अजित पवार : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळं शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलंय. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झालीय.”
कुटुंबावर दुःखाचा डोंगर : जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. वल्लभ बेनके हे प्रथम 1985 साली जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 1990 मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले. वर्ष 2004 व 2009 मध्ये पुन्हा त्यांनी जुन्नर मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं.
परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळं त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या वल्लभ बेनके यांच्या निधनामुळं आमदार अतुल बेनके आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आमदार अतुल बेनके आणि कुटुंबीयांच्या तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे.
स्वर्गीय वल्लभ बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.सलग सहा वेळा आमदार : वल्लभ बेनके हे सलग सहावेळा 1985 ते 2009 या कालावधीत जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले.
तर, दोन वेळा विधानपरिषदेतून आमदार झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा, कुशल संघटक आणि प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते.