जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई :- पोलिस निरीक्षक सतीश होडगर
1 min readबेल्हे दि.१० – आळेफाटा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी बेल्हे (ता.जुन्नर) येथे स्थानिक ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी सामाजिक सलोखा सांभाळून एकमेकांचे सण-उत्सव साजरे करा, असे आवाहन त्यांनी केले.
याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी असे सांगितले की ग्रामस्थांनी आपापले सण साजरे करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरे करावे कायद्याचे पालन करावे, कायदा हातात घेऊ नये अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, कोणाला काही अडचण आल्यास २४ तास पोलीस ठाणे उघडे आहे. तसेच आमच्याकडून कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ. आम्हाला शासनाने जी वर्दी दिली आहे आम्ही त्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठीच करत असून काम करत असताना जाणीवपूर्वक जर कोणी समाजात तेढ वाढवीत असेल तर अशा गुन्हेगारांना सोडले जाणार नाही आणि कोणाला वाटत असेल की माझ्यावर अन्याय झाला आहे. तर सरळ माझ्याकडे या आणि येताना कोणाही मध्यस्थाला आणू नका आणि भारतीय राज्यघटनेनुसारच मी काम करणार आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी.
बेल्हे गावात काही दिवसापूर्वी झालेल्या भांडणांमध्ये दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांविरुद्ध तक्रार करताना पूर्वग्रहदूषित पणा ठेवून काही मुलांची नावे दिली व त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
काहीही कारण नसताना गुन्हे दाखल झाल्यामुळे गरीब कुटुंबातील ती व्यक्ती अक्षरशः भरडली जाते व नाहक मनस्ताप होऊन त्यांना त्रास होतो. याबद्दल शहनिशा करूनच गुन्हे दाखल करावेत अशी सूचना माजी उपसरपंच निलेश कणसे यांनी मांडली.यावेळी प्रदीप पिंगट यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांचे स्वागत करताना शिवजन्मभूमीमध्ये आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
आपण दिलेल्या सूचनांचे आम्ही नक्कीच पालन करू,परंतु काहीही कारण नसताना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा व्यक्तींना कठोर शिक्षा होऊ नये असे वाटते. तसेच आमच्या बेल्हे ग्रामस्थांकडून पोलीस ठाण्याला नेहमी सहकार्याची भावना आहे व राहील असे सांगितले.या बैठकीला पोलीस निरीक्षक सतीश होडगर, बेल्हे बीटचे विकास गोसावी, सचिन रहाणे, निलेश शितोळे व उपसरपंच राजेंद्र पिंगट, सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके, प्रदीप पिंगट, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुंजाळ, उपाध्यक्ष सुधाकर सैद, माजी उपसरपंच जाफर पठाण, निलेश कणसे. मुस्लिम जमातीचे सदर वसीम बेपारी, रियाज व्यापारी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष स्वप्निल भंडारी, नाना भुजबळ, नाजीम बेपारी व इतरही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे आभार पोलीस नाईक विकास गोसावी यांनी मानले.