शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे डिंगोरे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
1 min readओतूर दि.२७:- ओतूर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबिर गुरुवार दिनांक १८ ते बुधवार दि. २४ रोजी घेण्यात आले .
या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये शुक्रवार दि. १९ रोजी अनंतराव कणसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, आळेफाटा यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने गावातील महिला, प्रौढ व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच शनिवार दि. २० रोजी शिवनेरी ब्लड बँक, मंचर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये ग्रामस्थ व गावातील आजुबाजुच्या परिसरातील तरुण युवक व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मिळून ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रविवार दि. २१ रोजी ग्रामस्वच्छता घेण्यात आली तसेच श्रीराम मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच सोमवार दि. २२ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी श्रीराम प्रतिमा प्रतिष्ठान कार्यक्रमादरम्यान गावात काढलेल्या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी व गावकरी सामील झाले. तसेच मंगळवार दि. २३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रॅली काढून पथनाट्य सादर करून समाजप्रबोधन केले.दुपारी २ ते ४ दरम्यान दैनंदिन घेण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेत माजी सैनिक व वनसंरक्षक रमेश खरमाळे यांनी पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले. तसेच सर्पदंशतज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी सर्पदंश जनजागृती या विषयावर व्याख्यान दिले. व डॉ संजय देवकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्यान देऊन अंधश्रद्धा निर्मूलनावर काही प्रात्यक्षिके करून दाखविली त्याचप्रमाणे विद्यार्थी व ग्रामस्थांना आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नाही अशी शपथ दिली. तसेच ज्ञानेश्वर ढोमसे यांनी विद्यार्थी व्यक्तिमत्व व स्मरणशक्ती या विषयावर व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ वासुदेव राऊत यांचे विद्यार्थ्यांची अभिरुची व शैक्षणिक जीवनातील आवड या विषयावर मार्गदर्शन केले.दैनंदिन घेण्यात येणाऱ्या प्रार्थना व व्यायाम यासोबतच अजित नलावडे यांनी प्राणायाम व योगासन सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी किल्ले संवर्धन कार्यक्रमांतर्गत शिवनेरी किल्ल्यावर जाऊन साफसफाई करून समाजापुढे एक स्वच्छतेचा आदर्श ठेवला शिबिराच्या सांगता समारंभासाठी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव तांबे, गावचे विद्यमान सरपंच सीमा सोनवणे. उपसरपंच निलेश लोहटे सर्व ग्रामपंचायत सदस्य पुष्पावती विद्यालयाचे मुख्याध्यापक अकोलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.यु खरात आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावचे सरपंच यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी केलेली गावातील स्वच्छता विद्यार्थ्यांनी श्रीराम प्रतिष्ठापना कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सहभागाचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्यांनी शिबिरातील सर्व कार्यक्रमांची माहिती देऊन जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले तसेच यावेळी वृक्ष रोपे व सन्मानचिन्ह देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले.
शिबिरासाठी संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे व राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग समन्वयक डॉ.अमोल बिबे यांनी सदिच्छा भेट दिली.शिबिर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक स्वप्निल डुंबरे डॉ. मोनिका रोकडे, डॉ पूजा घोलप, प्राध्यापक सिद्धार्थ पानसरे, ग्रंथपाल शामराव बढे, प्राध्यापक काजल फापाळे, प्राध्यापक ऋतुजा पोखरकर यांनी अथक परिश्रम घेतले. शिबिरासाठी संगणक विभाग प्रमुख डॉक्टर सुनील खताळ, कार्यालय अधीक्षक विशाल बेनके, मेकॅनिकल विभागप्रमुख प्राध्यापक सचिन जाधव, प्राध्यापक सुधीर ढेंबरे, प्राध्यापक श्रुती थोरात यांनी विशेष सहकार्य केले.