आळे येथील श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिरात धान्य उगवणीचा शुभारंभ
1 min readआळेफाटा दि.२२:- आळे (ता.जुन्नर) श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिर या ठिकाणी धान्य उगवणीचा शुभारंभ शिवनेर भुषण ह.भ.प.राजाराम महाराज जाधव व ह.भ.प.सुदाम महाराज बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप निमसे, उपाध्यक्ष निलेश भुजबळ, सचिव अविनाश कु-हाडे,
खजिनदार अमोल भुजबळ, धनंजय काळे, व्यवस्थापक कान्हू पाटील कु-हाडे, विलास शिरतर, संतोष कु-हाडे, म्हतु सहाने, पांडुरंग डावखर, संजय गाढवे, सुनिल जाधव, गणेश शेळके, संदिप पाडेकर, होनाजी गुंजाळ, ज्ञानेश्वर गाढवे, दिनकर राहिंज, संतोष डावखर, चारूदास साबळे, गिरीष कोकणे, गणेश गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान देवस्थान ट्रस्ट चे संचालक प्रसन्न डोके यांनी सकाळ शी बोलताना सांगितले की पूर्वी आपल्या भागात उगवणी (धान्य) गोळा करण्याची परंपरा होती, आपल्या जुन्या रूढी परंपरा नुसार आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधव दिवाळीनंतर आपल्या शेतात जे धान्य पिकायचं ते खळ्यामध्ये आणून त्यावर मळणी करून झालेल्या धान्यामधून एक पायली,
आधुली (माप) त्यावेळी आपण देवासाठी काढून ठेवत असायचो पहिलं दान देवाला मग बाकी सर्वांना पहिलं दान देवाला दिलं की आपल्या धन धान्यात भरभराट व्हायची अशी इच्छा मनात असायची, व त्यामुळे सर्व ग्रामस्थ हि पद्धत अवलंबत होते. त्यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे सेवेकरी घरोघरी जाऊन जे धान्य आपण देवासाठी काढून ठेवायचो ते घेऊन जात असत व देवस्थानच्या वतीने त्या कुटुंबाला श्री माऊलींचा प्रसाद घरपोच करत असत,
तसेच हे गोळा झालेल्या धान्य (उगवणी) यातून देवस्थान मध्ये असलेले सर्व पुजारी व सेवेकरी यांचा उदरनिर्वाह चालत होता, कित्येक वर्ष हि परंपरा चालू होती, मधल्या काळात देवस्थानचे सेवेकरी हभप मच्छिंद्र महाराज गावडे हे स्वतः सायकलवर, रिक्षामधून आळे, संतवाडी, कोळवाडी या गावात जाऊन (धान्य) उगवणी गोळा करत होते परंतु दोन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झाल्यापासून हि परंपरा खंडित झाली होती,
परंतु नव्याने आलेल्या विश्वस्त मंडळाने हि उगवणीची परंपरा पुन्हा चालू करण्याचे ठरवले असून तिन्ही गावातील भागाभागामध्ये वाहन (टेम्पो) पाठवून उगवणी (धान्य) गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती उपस्थित पत्रकारांना यावेळी देण्यात आली.
तसेच श्री ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे वाहन आपल्या भागात आल्यावर गहू, बाजरी, तांदूळ, भुईमुगाच्या शेंगा, सोयाबीन, मठ, हुलगे, हरभरा व इतर असणारे शेतातील धान्य तयार ठेवावे व या पुण्य अशा महायज्ञामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक कान्हू पाटील कु-हाडे यांनी केले आहे.