समर्थच्या ३०० विद्यार्थांनी केली नारायणगडाची स्वच्छता

1 min read

नारायणगाव दि.२१:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ऐतिहासिक स्थळ दत्तक योजने अंतर्गत समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३०० विद्यार्थ्यांनी नुकतीच नारायणगड येथे भेट दिली.
स्वच्छता हीच निरोगी आणि समृद्ध जीवनाची पहिली पायरी असून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत .असे मत रासेयो समन्वयक प्रा.दिनेश जाधव यांनी नारायणगड येथे व्यक्त केले. हातात झाडू, खराटे, खोरी, घमेले इ.प्रकारची साधनसामग्री बरोबर घेऊन पायथ्यापासून ते हस्तमाता मंदिरापर्यंत सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेबरोबरच नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेत विविध प्रकारच्या वनस्पतींची माहिती देखील घ्यायला हे विद्यार्थी विसरले नाहीत. सांबरकांड, गंधार, कडुनिंब, टाखळ, निलगिरी, सुबाभूळ, बोरी, लळई, धावडा, मोराई, पिठवणी, मोहाची झाडे, सीताफळ, आपटा, अंजन, आवळा, आंबा, बेहडा, चंदन, चिंच, हिरडा, जांभूळ, तरवड, रानझेंडू, अडुळसा, दंती, घाणेरी, कोरफड, हिंगनबेट, करवंद, बेल. कवठ, करावी, येलतुरा, वड, फ्रेरिया इंडिया त्याचप्रमाणे नारायणगडावरील प्रसिद्ध मानली जाणारी दुधकुडा ही वनस्पती मोठया प्रमाणात या ठिकाणी आढळते. विविध प्रकारचे पक्षी, कीटक फुले, फळे यांचा खजिनाच या गडावर आहे. काही अंशी विषारी आणि बिनविषारी साप देखील आढळून येतात. सुंदर परिसर हाच आमचा ध्यास आणि त्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू अशी घोषणा देत गड, किल्ले आणि दुर्ग ही राष्ट्राची संपत्ती जतन करण्यासाठी पुढाकार घेऊन त्याचा वारसा पुढे चालवू असे रासेयो शिबिरार्थींनी यावेळी दाखवून दिले. पाण्याच्या टाक्यांमधील शेवाळ, गाळ, माती आणि आजूबाजूचे गवत काढून टाक्यांची स्वच्छता विद्यार्थ्यांनी केली. नारायणगडचा इतिहास आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांना माहीत करून देण्यासाठी दरवर्षी या गडावर येऊन स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची माहिती प्रा.भूषण दिघे यांनी दिली.यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, रासेयो समन्वयक प्रा.दिनेश जाधव, प्रा.भूषण दिघे, प्रा.सचिन भालेकर, प्रा.गौरी भोर, प्रा.अश्विनी खटिंग, प्रा.साबळे, प्रा.भागवत तसेच ३०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे